'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जण ठार, ४ सहकाऱ्यांचाही खात्मा - रिपोर्ट

operation sindoor : बहावलपूरमधील सुभान अल्लाह मशिदीवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जणांचा आणि त्याच्या चार जवळच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे एका निवेदनाद्वारे...
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर, संग्रहित छायाचित्र
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहर, संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'बीबीसी उर्दू'ने दिले आहे.

बहावलपूरमधील सुभान अल्लाह मशिदीवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात अजहरच्या कुटुंबातील १० सदस्य आणि चार जवळचे सहकारी मारले गेल्याचे जैश-ए-मोहम्मदने एका निवेदनाद्वारे सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. सोशल मीडियावर निवेदन व्हायरल देखील झाले आहे. मृतांमध्ये अजहरची मोठी बहीण आणि तिचा पती, मसूद अजहरचा पुतण्या आणि त्याची पत्नी, आणखी एक भाची आणि त्याच्या कुटुंबातील पाच मुले यांचा समावेश आहे.

मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात मसूद अजहरचा एक जवळचा सहकारी आणि त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारीही ठार झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली असून, "या अत्याचाराने सर्व नियम मोडले, आता कोणीही दयेची आशा करू नये", अशी धमकीही देण्यात आली आहे.

बहावलपूर हे पाकिस्तानातील १२ वे सर्वात मोठे शहर आहे आणि लाहोरपासून ४०० किमी अंतरावर आहे. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर समोर आलेल्या व्हिडिओंनुसार, सुभान अल्लाह कॅम्पचे ढिगाऱ्यात रूपांतर झाले आहे. तर मशिद देखील उद्ध्वस्त झाली आहे. येथे जैश-ए-मोहम्मदकडून दहशतवादी भरती, निधी संकलन आणि दहशतवादी प्रशिक्षणाचे केंद्र चालवले जात होते.

दरम्यान, भारताने केलेल्या कारवाईत पाकमधील एकूण नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. हे तळ संबंधित दहशतवादी संघटनांचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र होते. ही ठिकाणं नियंत्रण रेषेपासून (LoC) अंतर राखून काळजीपूर्वक निवडण्यात आली होती. गुप्तचरांकडून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे कोणत्या अड्ड्यांना लक्ष्य करायचं हे निश्चित करण्यात आलं होतं. “भारतीय कारवाईत कोणतेही लष्करी अथवा नागरी स्थळ लक्ष्य केले गेलेले नाही, मात्र पाकिस्तानकडून कोणतीही चूक किंवा आगळीक झाल्यास परिस्थिती चिघळू शकते,”असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in