

नवी दिल्ली: केंद्र सरकारने एअरलाईन्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. आसन (सीट) निवडताना आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्काबाबत अनेक प्रवाशांकडून तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेत सरकारने आता एअरलाईन्सना त्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असून नव्या नियमांनुसार, प्रत्येक फ्लाइटमध्ये किमान ६० टक्के सीट्स प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.
सीट निवडण्याच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावरआता लगाम बसणार आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत अनेक एअरलाईन्स कंपन्या सीट निवडण्यासाठी मनमानी शुल्क घेत होत्या. त्यामुळे प्रवाशांना तिकीट घेतल्यानंतरही अधिक पैसे मोजावे लागत होते.
एकत्र बसण्याची सोय
यासोबतच आणखी एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. जर एखादे कुटुंब किंवा मित्रांचा गट एकाच पीएनआरवर तिकीट बुक करून प्रवास करत असेल, तर एअरलाईन्स कंपन्यांनी शक्यतो त्या सर्व प्रवाशांना एकमेकांच्या शेजारील सीट्स देण्याची व्यवस्था करावी, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. अनेकदा एकाच बुकिंगवर प्रवास करत असूनही प्रवाशांना वेगवेगळ्या जागा दिल्या जात असल्याने गैरसोय होत होती. नव्या निर्देशांमुळे ही समस्या कमी होण्याची शक्यता आहे.
पाळीव प्राण्यांबाबत सूचना
याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी सामान, पाळीव प्राणी आणि इतर सेवांबाबतही स्पष्ट नियम करण्यास सांगण्यात आले आहे. क्रीडा साहित्य किंवा वाद्यांसारख्या वस्तू नेण्याबाबत एअरलाईन्सनी पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल धोरण ठेवावे, तसेच पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावीत, असेही सांगण्यात आले आहे.
प्रवास सोयीसाठी निर्देश
सरकारने प्रवाशांच्या अधिकारांबाबतही अधिक कडक भूमिका घेतली आहे. फ्लाइट उशीर होणे, रद्द होणे किंवा बोर्डिंग नाकारले जाणे अशा परिस्थितीत प्रवाशांना कोणते हक्क आणि सुविधा मिळतात, याची माहिती एअरलाईन्सनी त्यांच्या वेबसाइट, मोबाईल अॅप, बुकिंग प्लॅटफॉर्म आणि विमानतळ काउंटरवर स्पष्टपणे नमूद करावी. तसेच ही माहिती प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवाई प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी सरकारने यापूर्वी उडान यात्री कॅफेसारख्या स्वस्त खाद्यपदार्थांच्या सुविधा आणि विमानतळांवर मोफत वाय-फायसारख्या उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले आहे.