२० महिन्यांत प्रत्येक घरात सरकारी नोकरी; माई-बहन योजनेत दरमहा २५०० रुपये; 'इंडिया' आघाडीच्या जाहीरनाम्यात आश्वासने
पाटणा : ‘इंडिया’ आघाडीने मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी, जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, २० महिन्यांत प्रत्येक घरात सरकारी नोकरीचे आश्वासन दिले आहे.
‘बिहार का तेजस्वी प्रण’ या जाहीरनाम्याचे प्रकाशन पत्रकार परिषदेत करण्यात आले. यावेळी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत आघाडीतील सहयोगी पक्षांचे नेते उपस्थित होते.
तेजस्वी यादव म्हणाले, “बिहार निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीचा जाहीरनामा २५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित आहे. ‘इंडिया’ आघाडीचे सरकार बिहारमध्ये स्थापन झाल्यानंतर २० दिवसांत रोजगार हमी देणारा नवीन कायदा लागू केला जाईल. ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर २० महिन्यांच्या आत संपूर्ण बिहारमध्ये ही योजना राबविली जाईल. सर्व ‘जीविका दीदींना’ कायम करण्यात येऊन त्यांना दरमहा ३० हजार रुपयांचे वेतन दिले जाईल. गरीबांना ५०० रुपयात प्रति गॅस सिलिंडर दिले जाणार आहे.
राज्यात आयटी पार्क, विशेष आर्थिक क्षेत्रे, दुग्ध आणि कृषीआधारित उद्योग, ‘एज्युकेशन सिटी’ आणि पाच नवीन द्रुतगती महामार्ग उभारण्याचेही आश्वासन दिले आहे.
बिहारमधील जनतेला गुन्हे आणि भ्रष्टाचारमुक्त शासन हवे आहे. त्यामुळे बिहारची जनता ‘एनडीए’ला निवडणुकीत धडा शिकवेल, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘जनतेला असे सरकार हवे आहे जे ‘पढाई’ (उत्तम शिक्षण), ‘दवाई’ (सुदृढ आरोग्य सेवा), ‘कमाई’ (रोजगार) आणि ‘सिंचाई’ (सिंचन सुविधा) देईल.’
रालोआवर हल्लाबोल
यादव यांनी रालोआवर टीका करत म्हटले, रालोआकडे बिहारसाठी कोणतीही दूरदृष्टी नाही. त्यांनी अजून निवडणुकीचा जाहीरनामा जाहीरही केलेला नाही. भाजप नेते आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बाहुली बनवले आहे. नितीश कुमारांचा वापर भाजप आपल्या फायद्यासाठी करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचे चेहरे असणार नाहीत.’
ते म्हणाले, ‘बिहार दारूबंदी कायदा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास आम्ही ताडीवरील बंदी उठवू, असे ते म्हणाले.
तेजस्वी यांनी पुढे सांगितले, इंडिया आघाडीचा जाहीरनामा हा बिहारच्या विकासाचा आराखडा आहे. राज्याला देशात क्रमांक एक बनवणार हे आमचे वचन आहे. जाहीरनाम्याच्या प्रकाशनावेळी ‘इंडिया’ आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पवन खेरा यांनी आपल्या पक्षाचे प्रतिनिधित्व केले, तर सीपीआय (एमएल) लिबरेशनचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य, व्हीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी आणि अन्य नेतेही उपस्थित होते.

