इंडिया आघाडी लोकसभेपुरतीच, विधानसभांसाठी घटक पक्ष स्वतंत्र; महाराष्ट्रात महाआघाडी राहणार: जयराम रमेश

गेली दहा वर्षे देशाची सत्ता गाजवत असलेल्या भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी स्थापन करण्यात आलेली इंडिया आघाडी ही केवळ २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपुरती केलेली आहे.
इंडिया आघाडी लोकसभेपुरतीच, विधानसभांसाठी घटक पक्ष स्वतंत्र; महाराष्ट्रात महाआघाडी राहणार: जयराम रमेश

रामपूरहाट (प. बंगाल) : गेली दहा वर्षे देशाची सत्ता गाजवत असलेल्या भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी स्थापन करण्यात आलेली इंडिया आघाडी ही केवळ २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपुरती केलेली आहे. राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकांसाठी ही आघाडी स्थापन करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी शुक्रवारी दिले. २७ पक्षांची ही आघाडी अस्तित्वात असून आगामी लोकसभा एकत्रितपणे लढेल, असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे पत्रकार परिषदेत जयराम रमेश बोलत होते. रमेश म्हणाले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड पक्षाने इंडिया आघाडीतून बाहेर पडून एनडीए आघाडीत प्रवेश केल्यानंतर इंडिया आघाडीतील एकूण घटक पक्षांची संख्या २८ वरून २७ झाली आहे. ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी असून विधानसभा निवडणुकांचा या आघाडीशी काहीही संबंध नाही. इंडिया आघाडी भाजप आणि आरएसएस यांच्या विचारसरणीचा पराभव करण्यासाठीच स्थापन करण्यात आली आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही आता धोक्यात आली असून ती वाचवण्यासाठी भाजपला हरवणे आवश्यक असल्याचा इशाराही रमेश यांनी यावेळी दिला.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेबाबत बोलताना रमेश म्हणाले की, ही यात्रा निवडणूक प्रचारमोहीम नसली व राजकीय कार्यक्रम असला तरी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ही यात्रा खूपच लाभदायी ठरणार आहे. या यात्रेमुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य संचारले असून ऊर्जा आली आहे. राहुल गांधी यांनी देखील ही यात्रा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नसून राजकीय असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. भाजप व काँग्रेसचे विचारसरणीचे युद्ध आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेचा प्रारंभ मणिपूरपासून झाला होता, तर शेवट २० मार्च रोजी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात महाआघाडी राहणार

‘‘महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) पक्ष एकत्रित लढणार आहेत. मात्र, अन्य राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांत कोणतीही युती होणार नाही. देशात काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, ज्याने केव्हाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या भाजपसोबत युती केली नाही,’’ असे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in