‘इंडिया’आघाडीत डाव्यांचा खोडा,जागावाटपाचा तिढा कायम

भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संयुक्तपणे स्वतंत्र उमेदवार उतरवतील, असा इशारा या डाव्या पक्षांनी दिला आहे.
‘इंडिया’आघाडीत डाव्यांचा खोडा,जागावाटपाचा तिढा कायम
Published on

पाटणा : ‘इंडिया’ आघाडीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जेडीयू आणि आपने काही जागांवर आपले उमेदवार परस्पर जाहीर केले आहेतच. आता डाव्या पक्षांकडून अडवणूकीची भाषा केली जात आहे. डाव्यांना योग्य प्रमाणात जागा न मिळाल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संयुक्तपणे स्वतंत्र उमेदवार उतरवतील, असा इशारा या डाव्या पक्षांनी दिला आहे. त्यामुळे आघाडीतील जागावाटपाचा तिढा अधिकच बिकट होत आहे.

‘भाकप’चे सरचिटणीस डी. राजा यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी जागावाटपावरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. २०१९ मध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाने एकत्र लोकसभा निवडणूक लढविली होती. यामध्ये भाजपला १७ तर ‘जेडीयू’ला १६ जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसच्या पदरात केवळ एकच जागा आली होती तर राष्ट्रीय जनता दलाला खातेही उघडता आले नव्हते. आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. नितीश यांच्या नेतृत्वाखालील ‘जेडीयू’ व लालू प्रसाद यांचा ‘आरजेडी’ पक्ष ‘इंडिया’ आघाडीत सहभागी झाला आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांचाही समावेश असलेल्या ‘इंडिया’कडून नितीशकुमार आणि लालू प्रसाद यांचे पक्ष १६-१६ जागांवर लढणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in