

नवी दिल्ली : ‘इंडिया आघाडी’च्या १० खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रात्री राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी शिष्टमंडळाकडून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनासुद्धा निवेदन देण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राहुल गांधी म्हणाले की, ‘देशात मते चोरली जात आहेत हे संपूर्ण देशाला माहित आहे आणि राष्ट्रपतींनीही याचा इन्कार केलेला नाही’. ज्ञानेश कुमार हे लोकशाही संपवत आहेत, असे म्हटल्यावर राष्ट्रपतींनी पुरावे देण्याबाबत सांगितले. ‘मला मतचोरी झाली, याचे पुरावे हवे आहेत. त्यावर, देशभरात पुरावे आहेत, आम्ही तुम्हाला पुरावे देऊ, असे आम्ही राष्ट्रपतींना सांगितले,’ असे राहुल गांधी म्हणाले.
राष्ट्रपतींसोबत सुमारे ३० मिनिटे चर्चा
‘राष्ट्रपती नकारात्मक वाटल्या नाहीत, त्यांनी आमचे पूर्ण म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास करू,’ असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी सांगितले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शुक्रवारी रात्री विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुमारे ३० मिनिटे राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, ओमर अब्दुल्ला यांच्यासह १० नेते उपस्थित होते.
खासदारांचा विजय चौक परिसरात ठिय्या
राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी निघालेल्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद परिसरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचा मोठा बॅनर घेतला होता. या बॅनरवर ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या,’ असा मजकूर होता. इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाला रोखण्यासाठी रायसीना हिल्स परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात १० खासदार राष्ट्रपती भवनात गेले, तर इंडिया आघाडीचे अन्य नेते आणि खासदारांनी विजय चौक परिसरात ठिय्या आंदोलन केले.