मुंबई : इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास ते राम मंदिरावर बुलडोझर फिरवतील या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त करतानाच, याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली. देशातील सर्व नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास आम्ही बांधील आहोत, असेही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी खर्गे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांच्यासह एक संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी खर्गे यांनी वरील बाब स्पष्ट केली.
इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास ते राम मंदिरावर बुलडोझर फिरवतील, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणात कपात करतील आणि अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करतील, असा आरोप मोदी यांनी केला होता. त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत या तीन नेत्यांनी भूमिका मांडली.
घटनेने दिलेले आरक्षण अबाधित राहील, आम्ही कधीही कोणावरही बुलडोझर चालविणार नाही. मोदी यांना खोटे बोलण्याची सवयच आहे, ज्या गोष्टी काँग्रेस पक्ष कधीही करणार नाही अथवा ज्यांची अंमलबजावणी करणे अशक्य आहे त्याबद्दल मोदी जनतेला चिथावणी देतात, असेही खर्गे म्हणाले.
अनुच्छेद ३७० बद्दल विचारले असता खर्गे म्हणाले की, आपण मोदी यांना उत्तर देण्यास बांधील नाही, आम्ही जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली आहेत त्यांची अंमलबजावणी केली जाईल, मोदी जेथे जातात तेथे फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. ते ८० कोटी जनतेला ५ किलो रेशन विनामूल्य देण्याबाबत बोलतात, असे खर्गे म्हणाले.
जुमला पर्व ४ जूनला संपणार - उद्धव
इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी अनेक उमेदवार आहेत. भाजपकडे केवळ एकच उमेदवार असून तोही काम करीत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपमध्ये क्षमता आहे आणि तो पक्ष स्वत:चे व्यवहार चालवू शकतो, तर रा. स्व. संघ विचारसरणीची आघाडी असून ते त्यांचे काम करतात, असे नड्डा म्हणाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ज्या संघटनेने पक्षाला जन्म दिला त्यांच्यापासूनच हे फारकत घेत आहेत. हे जुमला पर्व ४ जून रोजी संपेल आणि अच्छे दिन येतील जेव्हा इंडिया आघाडी सत्तेवर येईल, असेही ठाकरे म्हणाले.
मोदींचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न - शरद पवार
अन्न सुरक्षा कायद्याबाबतचा निर्णय मागील सरकारने घेतला आणि आता ५ किलो रेशन देण्याचे श्रेय मोदी घेत आहेत, असे पवार म्हणाले. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम इंडिया आघाडी पूर्ण करील, असे उद्धव ठाकरे म्हणाले तर केवळ मंदिरेच नव्हेत तर सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांचे आपले सरकार रक्षण करील, असे शरद पवार म्हणाले.