इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध

केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने शनिवारी घेतला. या विधेयकाला द्रमुक, अकाली दल, बीआरएस, वायएसआर काँग्रेस यांनी पाठिंबा दर्शवला आहे, तर काँग्रेस, समाजवादी पार्टी, ठाकरे शिवसेना यांनी विरोध केला आहे...
इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध
इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध
Published on: 

गौरव विवेक भटनागर / नवी दिल्ली

केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने शनिवारी घेतला. या विधेयकाला द्रमुक, अकाली दल, बीआरएस, वायएसआर काँग्रेस यांनी पाठिंबा दर्शवला आहे, तर काँग्रेस, समाजवादी पार्टी, ठाकरे शिवसेना यांनी विरोध केला आहे. आता संख्याबळ आपल्या बाजूने वळविण्यासाठी उभय आघाड्यांमध्ये पडद्याआडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवार गटाचा या विधेयकाला पाठिंबा मिळण्याची चिन्हे असून त्यावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी नाराजीचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारपासून (३० नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शनिवारी सकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या संसदीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश आणि प्रियांका गांधी-वाड्रा उपस्थित होते. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी यांसह अनेक विरोधी पक्षांचे प्रतिनिधीही बैठकीला उपस्थित होते. तृणमूलचे अभिषेक बॅनर्जी, राजदचे अभय कुमार सिंह आणि मनोज झा तसेच राज्यसभा खासदार कपिल सिब्बल हेही उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खर्गे यांनी प्रस्तावित विधेयकाला सामूहिक विरोध करण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. हे विधेयक लोकशाहीसाठी गंभीर धोका असल्याचा आरोप त्यांनी केला. "मोदी सरकार आणत असलेल्या घटनादुरुस्ती विधेयकामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यांना लोकशाही नष्ट करून सत्तेवर पूर्ण नियंत्रण मिळवायचे आहे," असा आरोप खर्गे यांनी केला.

सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेल्या '४०० पार' घोषणेचा संदर्भ देत खरगे म्हणाले की, आता सरकार लोकसभेतील सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. "निवडणुकीत त्यांनी ४०० पारचा नारा दिला होता, मात्र तो प्रत्यक्षात उतरला नाही. आता लोकसभेतील जागा ८५० पर्यंत वाढवून कायमस्वरूपी सत्ता टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे," असा आरोप खर्गे यांनी केला.

अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींच्या (एसटी) हितसंबंधांकडे प्रस्तावित प्रक्रियेत दुर्लक्ष झाल्याचा मुद्दाही खरगे यांनी उपस्थित केला. लोकसभेतील जागा वाढविताना एससी आणि एसटीसाठी राखीव जागांची संख्या प्रमाणानुसार वाढली पाहिजे, मात्र प्रस्तावात अशी तरतूद नसल्याचा आरोप त्यांनी केला. २०२६ची जनगणना अद्याप झालेली नसतानाही या मुद्द्याचा विचार करण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले.

पुनर्रचना प्रक्रियेसाठी विरोधकांनी तीन अटी ठेवल्या आहेत. लोकसभेची विद्यमान सदस्यसंख्या कायम ठेवावी, सध्याच्या सदस्यसंख्येतच महिला आरक्षण लागू करावे आणि राज्यांमधील विद्यमान जागावाटप पुढील २५ वर्षांसाठी कायम ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)