नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे निवडणूक आयोग सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. राहुल गांधी यांनी सादरीकरणाद्वारे विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतचोरी झाली, हे पुराव्याने आणि आकडेवारीने दाखवून दिले आहे. भाजप व निवडणूक आयोगाच्या संघटित मतचोरीचा जाब विचारण्यासाठी आणि मतदार फेरपडताळणी विरोधात इंडिया आघाडी सोमवारी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर धडक देणार आहे.
नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी कर्नाटकसह हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांचा घोटाळा झाल्याचे सादरीकरण राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आले. काँग्रेसने मतचोरी आरोपांवर सखोल अभ्यास करून मतचोरीचा घोटाळा कसा झाला, याची आकडेवारी यावेळी सादर केली. खुद्द राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना याविषयी मार्गदर्शन केले. राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने त्यांच्या आरोपांसाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. मात्र, लोकसभेत शपथ घेतली आहे, त्यामुळे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे.
‘शकुन राणी’प्रकरणी राहुल गांधींना नोटीस
लोकसभा निवडणुकीत मतचोरी केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. त्यासंबंधी पुरावे देताना राहुल गांधींनी ‘शकुन राणी’ या महिलेचा संदर्भ दिला होता. त्या शकुन राणीने दोन वेळा मतदान केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. त्यावर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. यासंबंधी सर्व पुरावे सादर करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. प्राथमिक चौकशीत राहुल गांधींनी दाखवलेला ‘टिक-मार्क’ असलेला दस्तावेज अधिकृत मतदान अधिकाऱ्यांनी दिलेला नाही, असे आढळून आले आहे. त्यामुळेच राहुल गांधींना संबंधित सर्व मूळ कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या आधारे आयोग प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.