

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संपूर्ण देशभरातून संतापाची लाट पसरली असून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. निवडणूक आयोगाविरुद्ध रणनीती आखण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीत आंदोलनांचे हत्यार उगारण्यात आले असून २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान देशभरात जिल्हापातळीवर मार्च आंदोलन केले जाणार असून १ नोव्हेंबरला राजधानी नवी दिल्लीत भव्य मोर्चा काढण्यात येईल. तसेच विरोधी पक्षांचे सर्व खासदार ६ ऑक्टोबर रोजी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढतील.
निवडणूक आयोगाची कार्यपद्धती आणि एसआयआर मोहिमेमधील कथित गैरव्यवहाराविरोधात इंडिया आघाडीची राजधानी नवी दिल्लीत साडेतीन तासांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, के. सी. वेणुगोपाल, तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, हरेंद्र मल्लिक, मेहबूबा मुफ्ती, डी. राजा, एम. ए. बेबी, एन. के. प्रेमचंद्रन, दीपंकर भट्टाचार्य आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत खर्गे आणि राहुल गांधी यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, झारखंड मुक्ति मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हजर होते. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष, विजय यांचा टीव्हीके आणि एम. के. स्टॅलिन यांचा डीएमके या बैठकीला उपस्थित नव्हते.
लोकशाहीचे अपहरण खपवून घेणार नाही...
राहुल गांधी म्हणाले, ‘आमची खूप चांगली चर्चा झाली. भाजप, पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि ज्ञानेश कुमार हे लोकशाहीवर हल्ला करत आहेत. या तिघांनी लोकशाहीचे अपहरण केले आहे. आम्ही हे मुकाट्याने सहन करणार नाही. जे लोकशाही नष्ट करतात, त्यांना शिक्षा होईल, हे आम्ही सुनिश्चित करू. भारतीय लोकशाही कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठी आहे. आम्ही एक आघाडी आहोत आणि देशात मोठे बदल घडवून आणू’.
इंडिया आघाडी काय करणार?
देशभरात जिल्हापातळीवर २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरी संघटनांसोबत ‘लोकतंत्र बचाओ’ आंदोलन केले जाईल.
विरोधी पक्षांचे सर्व खासदार ६ ऑक्टोबर रोजी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढतील.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि घटनात्मक हक्कांच्या रक्षणासाठी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन निवेदन सादर करतील.
ईव्हीएमऐवजी पुन्हा जुन्या ‘बॅलेट पेपर’ पद्धतीने मतदान घेण्याची मागणी तीव्र केली जाईल.g जनतेला मतदार याद्यांमधील गडबड आणि ‘मतचोरी’च्या मुद्द्यांवर जागरूक करण्यासाठी ५ मोठ्या संयुक्त सभांचे आयोजन केले जाईल.
१ नोव्हेंबरला दिल्लीत सर्वात मोठी रॅली काढण्यात येईल.
सर्वोच्च न्यायालयात जितकी प्रकरणे आहेत, त्यांना बाजूला करून एसआयआर संबंधातील प्रकरणी त्वरित सुनावणी केली पाहिजे.
बैठकीत सहा मुद्द्यांवर चर्चा
तब्बल तीन ते साडेतीन तास चाललेल्या बैठकीत एकूण सहा मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. खर्गे म्हणाले की, ‘मोदी आणि शहा हे निवडणूक आयोगाला कळसूत्री बाहुल्यांसारखे वापरत आहेत. ते मतांची चोरी करून या चोरीतून निवडणुका जिंकत आहेत. जिथे कुठे आमचे नेते न्यायासाठी, लोकशाहीसाठी आणि तरुणांसाठी लढत आहेत, तिथे ते त्यांचा छळही करत आहेत’.