इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन यांचा उमेदवारी अर्ज दाखल; उपराष्ट्रपतीपद निवडणूक

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी उपस्थित होते.
इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन यांचा उमेदवारी अर्ज दाखल; उपराष्ट्रपतीपद निवडणूक
Photo : X (@kharge)
Published on

नवी दिल्ली : इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी उपस्थित होते.

बी. सुदर्शन रेड्डी यांनी २७ डिसेंबर १९७१ रोजी आंध्र प्रदेश बार कौन्सिल, हैदराबाद येथे वकील म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात वकिली केली. २ मे १९९५ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर ५ डिसेंबर २००५ रोजी ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. पुढे १२ जानेवारी २००७ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आणि ते ८ जुलै २०११ रोजी निवृत्त झाले.

भाजपची खेळी, काँग्रेसकडून प्रत्युत्तर

पुढच्या वर्षी मार्च, एप्रिलदरम्यान तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपने मूळचे तमिळनाडूमधील असलेले सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. यामुळे दक्षिण भारतात विशेषतः तमि‍ळनाडूत या माध्यमातून चांगला संदेश जाईल. तसेच यानिमित्ताने भाजपला दक्षिण भारतात पाय आणखी घट्ट करता येईल, असा भाजपचा कयास असण्याची शक्यता आहे. मात्र, काँग्रेसनेही उपराष्ट्रपतीपदासाठी दक्षिण भारतातील उमेदवार देऊन काँग्रेसच्या या खेळीला प्रत्युत्तर दिले आहे.

उपराष्ट्रपतीपदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होईल. यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मतदान होईल. त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ ऑगस्ट आहे, तर २२ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारांना नामांकन अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट आहे.

logo
marathi.freepressjournal.in