एकजुटीने लढणार! इंडिया आघाडीचा निर्धार; मोदी, शहा, ज्ञानेश हेच मतचोरीचे सूत्रधार - राहुल गांधी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि वाेटचोरीविरुद्ध रान उठविणाऱ्या इंडिया आघाडीने आता हा लढा एकजुटीने लढण्याचा आणि त्यामध्ये विजय प्राप्त करण्याचा निर्धार मंगळवारी व्यक्त केला.
एकजुटीने लढणार! इंडिया आघाडीचा निर्धार; मोदी, शहा, ज्ञानेश हेच मतचोरीचे सूत्रधार - राहुल गांधी
एकजुटीने लढणार! इंडिया आघाडीचा निर्धार; मोदी, शहा, ज्ञानेश हेच मतचोरीचे सूत्रधार - राहुल गांधी(संग्रहित छायाचित्र)
Published on: 

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि वाेटचोरीविरुद्ध रान उठविणाऱ्या इंडिया आघाडीने आता हा लढा एकजुटीने लढण्याचा आणि त्यामध्ये विजय प्राप्त करण्याचा निर्धार मंगळवारी व्यक्त केला. देशातील लोकशाही प्रक्रियेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी विरोधकांचा व जनतेचा लढा असाच सुरू राहील आणि तो निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे ज्यांनी देशात मतांची चोरी केली आहे त्यांना नक्कीच न्यायालयात खेचले जाईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार व अंमलबजावणी करणारे असल्याचा आरोपही गांधी यांनी केला.

राहुल गांधी यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडी आणि नागरी समाजाच्या सदस्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालय आणि देशाचे सरन्यायाधीश यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. लोकशाही वाचवण्याच्या या प्रक्रियेत न्यायव्यवस्था आपली योग्य भूमिका पार पाडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने काढण्यात आलेला महामोर्चा हा केवळ राजकीय पक्षांचा नसून तो संपूर्ण भारतातील जनतेचा आवाज होता, असे सांगत त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले.

राहुल गांधी यांनी देशातील राजकीय परिस्थिती आणि 'व्होट चोरी'च्या (मते चोरण्याच्या) मुद्यावरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधताना सांगितले की, कोणतीही संस्था असो वा राजकीय दबाव, लोकांचा हा लढा असाच सुरू राहील आणि शेवटी सत्याचाच विजय होईल. सोमवारी सर्वोच्च न्यायालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य निषेध मोर्चा आणि निदर्शनांनंतर राहुल गांधींनी उपस्थितांचे आभार मानले. हा केवळ काही राजकीय पक्षांचा लढा नसून संपूर्ण भारताच्या जनतेचा आवाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताची घटना नष्ट करून कुणीही सहजासहजी पळून जाऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी 'व्होट चोरी'मध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.

प्रमुख नेते उपस्थित

राहुल गांधींच्या ५, सुनेहरी बाग रोड येथील निवासस्थानी झालेल्या या चहापानाच्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि मनोज झा, जेएमएमच्या महुआ माझी, समाजवादी पक्षाचे हरेंद्र मलिक, आनंद भदौरिया आणि मोहिबुल्ला नदवी, सीपीआय(एम)चे एम. ए. बेबी, सीपीआयचे डी. राजा व पी. संतोष कुमार, आयसाच्या प्रमुख नेहा बोरा आणि टीएमसीच्या महुआ मोइत्रा यांच्यासह अनेक दिग्गज विरोधी पक्षनेते आणि विद्यार्थी नेते उपस्थित होते.

दारुण पराभवासाठी तयार राहा - अमित शहा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि विशेष सखाेल पुनरीक्षण प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत सुरू असलेल्या आंदोलनांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधकांवर टीका केली. “देशातील जनता भाजप, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे सांगत, २०२९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘दारुण पराभवाला सामोरे जाण्यासाठी तयार राहा,” असा टोला शहा यांनी राहुल गांधी आणि विरोधकांना लगावला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in