इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी ; जागा वाटपाबाबत महत्वाची माहिती

ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये विरोधकांची संयुक्त रॅली काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी ;  जागा वाटपाबाबत महत्वाची माहिती

देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठतीक एका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीची पहिली बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. या बैठकीला डी राजा, केसी वेणूगोपाल, तेजस्वी यादव, संजय राऊत, राघव जढ्ढा, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठतील एका मोठा निर्णय घेण्यात आला.

ही बैठक पार पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितलं की, ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये विरोधकांची संयुक्त रॅली काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसंच जागावाटपाचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत सर्व पक्ष चर्चा करुन लवकरात लवकर निर्णय घेतील, अशी माहिती या पत्रकार परिषदेत त्यांनी दिली.

वेणुगोपाल पुढे बोलताना म्हणाले की, भोपाळमधील पहिल्या रॅलीत देशातील महागाई बेरोजगारी आणि भाजपाच्या भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर भाष्य केलं जाईल. तसंच काही मीडिया ग्रुपच्या शोमध्ये इंडिया आघाडीतील कोणताही नेता सामील होणार नाही, असा देखील निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती वेणुगोपाल यांनी दिली.

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, सर्व पक्ष लवकरात लवकर जागा वाटपाबाबत निर्णय घेतील. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीकडील पक्षांकडे असलेल्या जागांबाबत चर्चा होणार नसून भाजप,एनडीएकडे असलेल्या जागांबाबत चर्चा करु, असं सांगितलं.

logo
marathi.freepressjournal.in