भारत १५६ 'एलसीएच प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदी करणार, ६२ हजार कोटी रुपयांचा व्यवहार, वैशिष्ट्य काय?

केंद्र सरकारच्या सुरक्षा समितीने या खरेदीला मंजुरी दिली आहे. हा व्यवहार ६२ हजार कोटी रुपयांचा आहे. हा आतापर्यंत सर्वात मोठा संरक्षण...
भारत १५६ 'एलसीएच प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदी करणार, ६२ हजार कोटी रुपयांचा व्यवहार, वैशिष्ट्य काय?
एक्स @rajnathsingh
Published on

नवी दिल्ली : भारताने १५६ भारतीय बनावटीचे ‘एलसीएच प्रचंड’ हेलिकॉप्टर खरेदीचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सुरक्षा समितीने या खरेदीला मंजुरी दिली आहे. हा व्यवहार ६२ हजार कोटी रुपयांचा आहे. हा आतापर्यंत सर्वात मोठा संरक्षण खरेदी व्यवहार असल्याचे म्हटले जात आहे.

संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या संरक्षण समितीने हा निर्णय घेतला.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर असेल. ‘तेजस’ लढाऊ विमानांच्या निर्मितीची देखील मोठी जबाबदारी ‘एचएएल’वर आली आहे. अमेरिकेने इंजिन देण्यास विलंब केल्याने ‘तेजस’ विमानांची निर्मिती थांबली होती. दोन दिवसांपूर्वीच पहिले इंजिन आले आहे. यामुळे आता ‘तेजस’ निर्मितीची प्रक्रिया जोरात सुरु होणार आहे. अशातच ‘एचएएल’ला आणखी एक मोठी ऑर्डर मिळाली आहे.

हेलिकॉप्टरची निर्मिती कंपनीच्या कर्नाटकातील बेंगळुरू आणि तुमकूर येथील प्लांटमध्ये केली जाणार आहे. प्रचंड हे हलके हेलिकॉप्टर असले तरी त्याची क्षमता मोठी आहे. उंच भागात शत्रूचे टँक, बंकर, ड्रोन नष्ट करण्यास ते सक्षम आहे. मजबूत चिलखत संरक्षण आणि रात्री हल्ला करण्याची क्षमता आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमध्येही ते काम करण्यास सक्षम आहे. हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे डागण्यास देखील ते सक्षम आहेत. या हेलिकॉप्टरमुळे पाकिस्तान आणि चीनच्या छातीत धडकी भरविण्याची ताकद हवाई दलात येणार आहे.

‘एलसीए प्रचंड’ची वैशिष्ट्ये

‘एलसीएच प्रचंड’मध्ये दोन जण बसू शकतात. ते ५१.१० फुट लांब व १५.५ फूट उंच हेलिकॉप्टर आहे. सर्व सामुग्रीसह त्याचे वजन ५८०० किलो आहे. ७०० किलो सामान यातून नेले जाऊ शकते. त्याचा वेग प्रति तास २६८ किमी आहे. तर एकाच खेपेत ते ५५० किमी प्रवास करू शकते. हे हेलिकॉप्टर ३ तास १० मिनिटे उड्डाण करू शकते. या हेलिकॉप्टरमध्ये २० मिमीची तोफही बसवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in