
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत जवळपास १३ हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सी याला कारागृहात अमानुष वागणूक दिली जाणार नाही, यासह अन्य १४ सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन केंद्र सरकारने बेल्जियमला दिले आहे. चोक्सी याला आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारताने ही औपचारिक आश्वासने दिली आहेत.
गृह मंत्रालयातर्फे याबाबत सांगण्यात आले की, चोक्सीला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील बॅरेक नंबर १२ मध्ये ठेवले जाईल. या कोठडीत ६ लोकांच्या राहण्याची क्षमता आहे. काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारतीय तपास यंत्रणेच्या प्रत्यार्पणाच्या आवाहनावर १२ एप्रिलला चोक्सीला अटक झाली. या प्रकरणात तो आणि त्याचा भाचा नीरव मोदी प्रमुख आरोपी आहेत.
कारागृहात काय सुविधा?
गर्दीपासून वेगळी असलेली १२ नंबरची कोठडी २० बाय १५ ची जेलमध्ये स्वतंत्र कोठडीमध्ये शौचालय आणि बाथरूम ३ वेळचे जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, झोपण्यासाठी कापसाची उशी, चादर आणि अंथरूण, कोर्टाच्या ऑर्डरवर मेटल अथवा लाकडाचा बेडसीलिंग फॅन आणि लाईट२४ तास सीसीटीव्ही ताज्या हवेसाठी खुले अंगण योग, मेडिटेशन आणि लायब्ररी, मनोरंजनासाठी बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि कॅरम, २४ तास आरोग्य सुविधा, आपत्कालीन परिस्थितीत जे.जे हॉस्पिटलला सुविधा, कोर्टाच्या ऑर्डरवर घरातील जेवणाची परवानगी आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.
दरम्यान, बऱ्याच काळापासून भारतीय तपास यंत्रणा चोक्सीचा शोध घेत होत्या. मेहुल चोक्सी २०२१ च्या अखेरीस अँटिग्वामधून पळून गेला होता, त्यानंतर भारतीय तपास यंत्रणा दोन महिने बेल्जियमच्या एजन्सींच्या संपर्कात होत्या. चोक्सी सध्या बेल्जियममध्ये तुरुंगात आहे.