बँकांसाठी अच्छे दिन! कर्ज वितरणातील वाढ पुढच्या वर्षीही दोन अंकी राहणार

भारतीय बँका २०२७ मध्येही दोन अंकी कर्जवाढ कायम ठेवतील अशी अपेक्षा असून, खर्च कार्यक्षमतेत होणाऱ्या सुधारणेमुळे बँकांची नफाक्षमता आणि भांडवली स्थिती स्थिर राहण्यास मदत होईल, असे 'फिच रेटिंग्ज'ने गुरुवारी म्हटले आहे.
बँकांसाठी अच्छे दिन! कर्ज वितरणातील वाढ पुढच्या वर्षीही दोन अंकी राहणार
बँकांसाठी अच्छे दिन! कर्ज वितरणातील वाढ पुढच्या वर्षीही दोन अंकी राहणार'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवी दिल्ली : भारतीय बँका २०२७ मध्येही दोन अंकी कर्जवाढ कायम ठेवतील अशी अपेक्षा असून, खर्च कार्यक्षमतेत होणाऱ्या सुधारणेमुळे बँकांची नफाक्षमता आणि भांडवली स्थिती स्थिर राहण्यास मदत होईल, असे 'फिच रेटिंग्ज'ने गुरुवारी म्हटले आहे.

मार्च २०२८ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारतीय बँकांची आर्थिक कामगिरी स्थिर राहील, असा फिचचा अंदाज आहे. भक्कम आर्थिक वाढीमुळे कर्जवाढ १५ टक्क्यांच्या आसपास उत्साहवर्धक राहील. तर धोरणात्मक व्याजदरातील (रेपो रेट) किंचित वाढीमुळे निव्वळ व्याज मार्जिन आणि उत्पन्नाला आधार मिळेल.

कर्जांचा कालावधी पूर्ण होत असताना मालमत्तेच्या गुणवत्तेवर (अॅसेट क्वालिटी) थोडा दबाव वाढण्याची शक्यता आहे, परंतु नियमित कर्जवसुली आणि निर्लेखनामुळे (राईट-ऑफ) हा दबाव संतुलित राहील. कर्जवाढ आणि वाढत्या खर्च कार्यक्षमतेमुळे नफाक्षमतेला बळ मिळेल आणि भांडवलीकरण स्थिर राहील, असे फिचने आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील बँकांवरील आपल्या अहवालात नमूद केले आहे.

अलिकडच्या वर्षांत असुरक्षित वैयक्तिक कर्जे (अनसिक्युअर्ड पर्सनल लोन्स) आणि कृषी-व्यवसाय कर्जांसह काही क्षेत्रांमध्ये झालेल्या वेगवान कर्जवाढीमुळे नवीन अनुत्पादक कर्जांचे प्रमाण किंचित वाढण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र बाह्य परिस्थितीबाबत संवेदनशील असतात.

आर्थिक वर्ष २०२७ मधील अंदाजित ०.६ टक्क्यांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२८ मध्ये एकूण कर्जांच्या तुलनेत कर्ज खर्च (क्रेडिट कॉस्ट) ०.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज फिचने वर्तवला आहे. असे असले तरी २०२८ या आर्थिक वर्षात अनुत्पादक कर्जांचे प्रमाण २ टक्क्यांच्या खालीच राहण्याची शक्यता आहे.

एसबीआयकडून १,५४० कनिष्ठ सहयोगींची भरती

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील राखीव प्रवर्गाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष भरती मोहिमेअंतर्गत १,५४० कनिष्ठ सहयोगींची नियुक्ती करण्याची घोषणा स्टेट बँक ऑफ इंडियाने गुरुवारी केली. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी बँकेच्या व्यापक मनुष्यबळ विस्तार धोरणाचा हा एक भाग असून, याअंतर्गत लिपिक आणि अधिकारी संवर्गातील सुमारे ११,००० ते १२,००० कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचे 'एसबीआय'ने निवेदनात म्हटले आहे. भरती बँकेच्या विकास उद्दिष्टांशी सुसंगत असून वर्षात बँकेचे जाळे २५० नवीन शाखांनी वाढवण्याचा मानस आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा वापर करून सुसज्ज आणि भविष्यासाठी तयार मनुष्यबळ घडवण्यावर, शिक्षण, कौशल्य विकासाद्वारे प्रतिभेला वाव देण्यावर बँकेचा भर आहे, असे एसबीआयचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)