आता पाक यूट्यूब वाहिन्यांवर बंदी; क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या चॅनेलचाही समावेश

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी आणली आहे.
आता पाक यूट्यूब वाहिन्यांवर बंदी; क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या चॅनेलचाही समावेश
Published on

नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी आणली आहे. यामध्ये प्रमुख वृत्तसंस्थांसहित पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे.

बंदी घातलेल्या यूट्यूब चॅनेलमध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज यांसारख्या प्रमुख पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. इर्शाद भट्टी, अस्मा शिराजी, उमर चीमा आणि मुनीब फारूख यांसारख्या पत्रकारांनी चालवलेले यूट्यूब चॅनेलही भारतीय वापरकर्त्यांसाठी ब्लॉक करण्यात आले आहेत. इतर बंदी घातलेल्या चॅनेलमध्ये द पाकिस्तान रेफरन्स, समा स्पोर्ट‌्स, उजैर क्रिकेट आणि रझी नामा यांचा समावेश आहे.

भारतात व्हिडीओ नाही

सरकारी सूत्रांनी सांगितले की, गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या वाहिन्या चुकीची आणि खोटी माहिती, जातीय तणाव निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेले कंटेंट पसरवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घातलेले चॅनेल्स पाहताना भारतीय वापरकर्त्यांना आता यूट्यूबकडून एक संदेश पाठवला जातो ज्यामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारच्या आदेशामुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही. तसेच, या प्रकरणावरून भारताने बीबीसी या आंतरराष्ट्रीय माध्यम समूहालाही फटकारले आहे.

शोएबची कमाई

शोएब यूट्यूबवरही सक्रिय आहे. त्याच्या चॅनेलवर त्याचे ६.१२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यातून त्याची चांगली कमाई होते. वेगवेगळ्या सूत्रांनुसार, शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून दरमहा सुमारे ६४ ते ३८८ डॉलर कमावतो. काही अहवालांनुसार त्याचे मासिक उत्पन्न ३२५,६०० डॉलरपर्यंत होते, यावरून त्याच्या चॅनेलची लोकप्रियता लक्षात येते. आतापर्यंत त्याचे व्हिडीओ ४२ कोटींहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत. शोएब अख्तरचे यूट्यूब चॅनल पाकिस्तानमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या यूट्यूब चॅनलपैकी एक आहे. यात भारतीय प्रेक्षकांचाही मोठा वाटा होता. पण, आता यावर परिणाम होईल.

भारत कधीही हल्ला करू शकतो - ख्वाजा आसिफ

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला आहे. भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानात घबराट पसरली आहे. भारत पाकिस्तानवर कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे आम्ही पाकिस्तानी सैन्याला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले. आमच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण झाल्यास आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू, असा इशारा त्यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in