भारताचे पाकवर बंदीअस्त्र! पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर घातली बंदी; पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांनाही भारतीय बंदरांमध्ये प्रवेशबंदी

नवी दिल्ली : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आल्यानंतर भारताने पाकिस्तानची नाकाबंदी करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून भारताने शनिवारी आणखी एक मोठे पाऊल उचलले. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घातली आहे.
भारताचे पाकवर बंदीअस्त्र! पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर घातली बंदी; पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांनाही भारतीय बंदरांमध्ये प्रवेशबंदी
छायाचित्र सौ. - FPJ
Published on

नवी दिल्ली : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आल्यानंतर भारताने पाकिस्तानची नाकाबंदी करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून भारताने शनिवारी आणखी एक मोठे पाऊल उचलले. भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, भारताने शनिवारी पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांनाही भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार, पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्देशानुसार भारताच्या ध्वजधारी जहाजांनाही पाकिस्तानातील बंदरांवर डॉकिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय मालमत्ता, मालवाहू जहाजे आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. हे निर्देश तत्काळ लागू झाले असून, पुढील सूचना येईपर्यंत ते कायम राहतील, अशी माहिती निर्देशांमध्ये देण्यात आली आहे.

पाकिस्तानमधून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंवर आता भारतात बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. या बंदीच्या निर्णयांतर्गत पाकिस्तानमधून येणाऱ्या कोणत्याही उत्पादनाच्या आयातीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. एवढेच नाही, तर पाकिस्तानमधून एखादी वस्तू आयात होणारी असो किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्या कोणत्याही देशातून पाकिस्तानी वस्तू भारतात आयात होणार असेल, तर त्यावरही बंदी असणार आहे.

सरकारने नेमके काय म्हटले

दरम्यान, वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे की, पाकिस्तानमधून भारतात होणाऱ्या सर्व वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मग ती मुक्तपणे आयात करता येण्यासारखी असो किंवा नसो, पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित असेल. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या निर्बंधातील कोणत्याही अपवादासाठी भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.

राष्ट्रीय हितासाठी जहाजबंदी

राष्ट्रीय हितासाठी सर्वात योग्य पद्धतीने भारतीय व्यापारी सागरी जहाजाच्या विकासाला चालना देणे आणि कार्यक्षम देखभाल निश्चित करणे हे यामागील उद्दिष्ट आहे, असे मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. पाकिस्तानचा ध्वज असलेल्या जहाजाला कोणत्याही भारतीय बंदरात येण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि भारतीय ध्वज असलेल्या जहाजाला पाकिस्तानच्या कोणत्याही बंदरात जाण्याची परवानगी मिळणार नाही, असेही आदेशात पुढे म्हटले आहे.

दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मॅन्युएल गोन्साल्विस लॉरेन्को यांची भेट घेतली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठकही घेत दहशतवादाच्या मुद्द्यावरून चर्चा केली. मोदी यांनी अंगोलामध्ये लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी २०० दशलक्ष डॉलरच्या संरक्षण कर्जाला मान्यता दिली आहे.

याशिवाय, संरक्षण प्लॅटफॉर्मची दुरुस्ती आणि पुरवठा यावरही करार झाला आहे. यावेळी मोदींनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरोधात कठोर आणि निर्णायक कारवाई करू, असा इशारा दिला. दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असेही मोदी म्हणाले.

पाकच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाघा-अटारी सीमा देखील बंद करण्यात आलेली आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देखील भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपले हवाई क्षेत्र बंद केलेले आहे. यानंतर आता पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर भारताने बंदी घातली आहे. त्यामुळे या सर्व निर्णयाचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे बोलले जात आहे.

टपाल आणि पार्सल सेवा स्थगित

भारत सरकारने शनिवारी पाकिस्तानमधून हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने येणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल आणि पार्सलची देवाण-घेवाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे दळणवळण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मोदी-अब्दुल्ला भेट

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारची कारवाई कशी सुरू आहे, सोबतच जम्मू-काश्मीरमध्ये येत असलेल्या पर्यटकांची सुरक्षा या संदर्भात सुरक्षेसंबंधीच्या उपाययोजनांवरही चर्चा झाली.

दहशतवाद्यांचा चेन्नईहून श्रीलंकेला प्रवास?

कोलंबो : पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित संशयित दहशतवादी विमानात असल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीलंकेच्या पोलिसांनी शनिवारी चेन्नईहून कोलंबोला येणाऱ्या विमानाची बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर झडती घेतल्याची माहिती श्रीलंकन पोलिसांनी दिली. चेन्नई एरिया कंट्रोल सेंटरकडून भारतात हवे असलेले दहशतवादी विमानात असल्याचे समजल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून ही झडती घेण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in