

बंगळुरू : जागतिक युद्धांमुळे कच्च्या मालाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ, पुरवठ्यातील टंचाई आणि राज्य सरकारांनी किमतींवर घातलेले निर्बंध यामुळे भारतीय बिअर उद्योग सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. 'युनायटेड ब्रुअरीज लिमिटेड'चे (युबीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक गुप्ता यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, सरकारने तातडीने हस्तक्षेप न केल्यास या क्षेत्रातील प्रगती आणि नवनवीन प्रयोग थांबतील, असा इशारा दिला आहे.
मागील दोन वर्षांत बीअर विक्रीचे प्रमाण ४.५-५% वाढले असून, मूल्यवाढ ७-८% राहिली आहे.
युद्धामुळे बाटल्या आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीत किमान १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटल्याने आयातीवरही परिणाम झाला असून, फायदेशीर असलेला निर्यातीचा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. बिअर उद्योगावर इतर उद्योगांच्या तुलनेत खर्चाचा परिणाम अधिक झाला आहे. ७५ टक्के व्यवसाय हा सरकारच्या नियंत्रणाखाली असून, राज्य सरकारांच्या अबकारी धोरणामुळे कंपन्यांना स्वतःहून किमती वाढवता येत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
गुप्ता यांनी सांगितले की, राज्य सरकारांना दिल्या जाणाऱ्या विक्री किमतीत १५ टक्के वाढ करण्याची मागणी आम्ही करत आहोत. अनेक राज्यांमध्ये उत्पादकांपेक्षा सरकारला मिळणारा कर अधिक आहे.
संकट काय?
बाटल्या, कच्चा माल, ॲल्युमिनियमच्या किमतीत वाढ
रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण
निर्यातीत घट
पुरवठा साखळीत अडथळे
कॅन आणि कच्च्या मालाची टंचाई
उतारा काय?
एक्साइज ड्युटीत सवलत
किंमत निर्धारणात लवचिकता