अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाचा भारताला लाभ - पंतप्रधान
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुशल नेतृत्वाचा भारताला चांगलाच लाभ झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे दिग्गज नेते आणि माजी पंतप्रधान वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.
सदैव अटल या वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळावर बुधवारी प्रार्थना करण्यात आली. तेव्हा पंतप्रधानांसोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि अनेक कॅबिनेट मंत्री तसेच विविध पक्षांचे नेते देखील उपस्थित होते. वाजपेयींना श्रद्धांजली वाहतांना पंतप्रधान म्हणाले की, ‘‘त्यांनी भारताच्या विकासाला चालना देऊन विविध क्षेत्रांना २१व्या शतकात नेण्यात अत्यंत महत्वाची भूमिका वठवली. तेव्हा देशाच्या १४० कोटी जनतेसह मी त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. भाजपचे पहिले पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांची नोंद झाली आहे. भाजपला जनमानसात स्थान देण्याचे महत्वाचे काम वाजपेयी यांनी केले. सहा वर्षे त्यांनी युतीचे सरकार चालवण्याचे श्रेय त्यांना जाते. त्या काळातही त्यांनी अनेक सुधारणा मार्गी लावल्या आणि पायाभूत सुविधात सुधारणा केली.’’