
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्यांदा ‘इंडिया’ आघाडीचे नेते १९ जुलैला संध्याकाळी भेटणार आहेत. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी त्यात सहभागी होणार नाही. मात्र शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी होणाऱ्या या बैठकीसाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे.
बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सुधारणा प्रक्रियेवरून सुरू असलेला गोंधळ व पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. ‘इंडिया’ आघाडीची अलीकडे शेवटची बैठक यावर्षी ३ जूनला झाली होती. या बैठकीत केंद्र सरकारकडून 'ऑपरेशन सिंदूर'वर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली होती.