

नवी दिल्ली : भारत आणि ब्राझील यांनी येत्या पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित केले असून दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रात सहकार्याचा करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डी सिल्वा यांच्यात झालेल्या विस्तृत चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
दोन्ही नेत्यांनी संरक्षण, ऊर्जा, आरोग्य, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यांसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. जागतिक भू-राजकीय वातावरणात भारत-ब्राझील धोरणात्मक भागीदारी अधिक सखोल करण्यावर त्यांनी भर दिला.
राष्ट्राध्यक्ष लुला १८ फेब्रुवारीपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये सहभाग घेतला आणि मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.
‘ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतील भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलरच्या पुढे नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. आमचा व्यापार केवळ आकडा नाही, तो परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे,’ असे मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत सांगितले.
२४-२५ या वर्षात भारत-ब्राझील व्यापार १२ अब्ज डॉलरवर पोहोचला असून त्यात भारताची निर्यात ६.७७ अब्ज डॉलर, तर ब्राझीलकडून आयात ५.४३ अब्ज डॉलर होती.
मोदी यांनी सांगितले की, दुर्मिळ खनिजांबाबतचा करार हे मजबूत आणि लवचिक पुरवठा साखळी उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या करारासोबतच डिजिटल भागीदारीवरील संयुक्त घोषणा करण्यात आली असून खाणकाम, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व आरोग्य व पारंपरिक ज्ञान प्रणाली या क्षेत्रांत सामंजस्य करार करण्यात आले.
संरक्षण क्षेत्रातील सहकार्य सातत्याने वाढत असल्याचे नमूद करत मोदी म्हणाले की, हे परस्पर विश्वास आणि धोरणात्मक समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे आणि ही ‘विन-विन’ भागीदारी अधिक बळकट करण्यात येईल.
ग्लोबल साऊथचा आवाज भक्कम
भारत आणि ब्राझील एकत्र काम करतात तेव्हा ‘ग्लोबल साऊथ’चा आवाज अधिक बळकट आणि आत्मविश्वासपूर्ण होतो. जागतिक पटलावर भारत-ब्राझील भागीदारी प्रभावी राहिली आहे. लोकशाही देश म्हणून आम्ही ग्लोबल साऊथच्या प्राधान्यक्रमांना आणि आकांक्षांना पुढे नेण्यास कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक : मोदी
मोदी म्हणाले की, भारत आणि ब्राझील यांची भूमिका स्पष्ट आहे. दहशतवाद आणि त्याला पाठिंबा देणारे हे मानवतेचे शत्रू आहेत. जागतिक पातळीवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे दोन्ही देशांचे मत असल्याचे त्यांनी नमूद केले.