नवी दिल्ली: पाकिस्तानच्या जवळील भागात भारताने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी लष्कराने सहा 'एके-६३०' हवाई संरक्षण गन खरेदी करण्यासाठी निविदा जारी केली आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये पाकिस्तान लष्कराने जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये दाट लोकसंख्या असलेल्या भागावर व धार्मिक स्थळांना लक्ष्य केले. आता या गन तैनात केल्याने सीमावर्ती भागात
हवाई धोक्यापासून चांगली सुरक्षा मिळेल. ही गन 'मिशन सुदर्शनचक्र'चा भाग आहे. 'एके-६३०' ही ३० मिमीची मल्टी बॅरल मोबाईल गन सिस्टीम आहे. ती प्रति मिनीट ३ हजार राऊंड झाडू शकते. याची मारक क्षमता ४ किमी आहे. ही यंत्रणा ड्रोन, रॉकेट, तोफांचा मारा, मोर्टार आदी हवाई हल्ले रोखण्यास सक्षम असेल. या यंत्रणेत सर्व हवामानात काम करू शकणारी, इलेक्ट्रो-ऑप्टिकल फायर कंट्रोल सिस्टम असेल. ती कोणत्याही वातावरणात आपल्या लक्ष्याची ओळख पटवेल.
भारतीय संरक्षण संशोधन संस्थेने (डीआरडीओ) ही यंत्रणा बनवली आहे. या यंत्रणेची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे.