पूर्व लडाखमधून भारत-चीन सैन्याची माघार सुरू; वेगवेगळ्या दिवशी गस्त घालण्याचा दोन देशांचा निर्णय

दोन्ही देशांचे सैन्य एप्रिल २०२० च्या पूर्वीच्या स्थितीत येतील. तसेच पूर्वीप्रमाणे गस्त घालतील आणि कमांडर स्तरावर बैठका होत राहतील.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

नवी दिल्ली: पूर्व लडाखच्या सीमेवरून भारत व चीनच्या सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. येत्या २८ व २९ ऑक्टोबरपर्यंत दोन्ही देशांचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघारी जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पूर्व लडाखच्या देमचोक व देपसांग पॉईंट येथून दोन्ही देशांच्या सैन्याने आपले तंबू व शेड हटवले आहेत. तसेच उपकरणे व लष्करी उपकरणेही दोन्ही देश मागे घेत आहेत.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ व २९ ऑक्टोबरपर्यंत दोन्ही देश देपसांग आणि डेमचोक या पॉईंटवरून आपले सैन्य मागे घेणार आहेत. तसेच गस्तीसाठी सैनिकांची संख्या निर्धारित केली आहे.

गलवान, हॉट स्प्रिंग गस्तीबाबत निर्णय नाही

भारत - चीनदरम्यान झालेल्या करारात गलवान खोरे, गोगरा हॉटस्प्रिंग येथील गस्तीबाबत मात्र निर्णय झालेला नाही.

कुठे गस्त घालणार?

भारतीय सैन्य दलाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य देपसांगमध्ये गस्ती पॉईंट १०, ११, ११-ए, १२ व १३ पर्यंत जाऊ शकतील, तर देमचोकमध्ये गस्ती पॉईंट १४ म्हणजे गलवान खोरे, गोगरा हॉट स्प्रिंग्स म्हणजे पीपी-१५ व पीपी १७ हे बफर विभाग असतील. बफर झोनमध्ये गस्तीबाबत नंतर विचार केला जाणार आहे. बफर झोन म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर येत नाही.

देपसांग व देमचोकहून सैन्य माघारी जाण्याची माहिती १८ ऑक्टोबरला समोर आली होती. दोन्ही देशांचे सैन्य एप्रिल २०२० च्या पूर्वीच्या स्थितीत येतील. तसेच पूर्वीप्रमाणे गस्त घालतील आणि कमांडर स्तरावर बैठका होत राहतील.

२०२० मध्ये भारत व चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात जोरदार चकमक झाली. त्यानंतर देपसांग व देमचोक येथे तणाव निर्माण झाला. ४ वर्षांच्या वाटाघाटीनंतर २१ ऑक्टोबर रोजी दोन्ही देशांमध्ये गस्तीबाबत नवीन करार झाला. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, लडाखमध्ये गलवानसारख्या चकमकी रोखणे व पूर्वीप्रमाणे परिस्थिती तयार करणे हा मुख्य उद्देश होता.

logo
marathi.freepressjournal.in