
नवी दिल्ली : २०२४ मध्ये भारताचा संरक्षणावरील खर्च पाकिस्तानच्या संरक्षण खर्चापेक्षा ९ पट अधिक होता, असा अहवाल स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने (सिप्री) दिला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढलेला असतानाच संस्थेने हा अहवाल जाहीर केला.
भारताचा लष्करी खर्च जगात पाचव्या क्रमांकावर आहे. भारताने संरक्षणावर ८६.१ अब्ज डॉलर, तर पाकिस्तानने १०.२ अब्ज डॉलर खर्च केले.
जगात संरक्षणावर सर्वात जास्त खर्च करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, चीन, रशिया, जर्मनी व भारताचा समावेश आहे. या पाच देशांचा संरक्षणावरील खर्च १,६३५ अब्ज डॉलर आहे. हे प्रमाण जागतिक संरक्षण खर्चाच्या ६० टक्के आहे.
चीनने संरक्षण खर्च ७ टक्क्याने वाढवला असून तो ३१४ अब्ज डॉलर झाला. गेले तीन दशके चीन सातत्याने संरक्षण खर्चात वाढ करीत आहे. चीनने सातत्याने आपल्या लष्कराचे आधुनिकीकरण केले आहे. सायबर युद्ध व अणुयुद्धासाठीही चीन तयार आहे.
युरोपसह रशियाने आपल्या संरक्षण खर्चात १७ टक्के वाढ केली आहे. त्यांचा खर्च ६९३ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. युक्रेन युद्ध झाल्यामुळे युरोपचा लष्करी खर्च वाढला आहे. रशियाचा संरक्षण खर्च २०२४ मध्ये १४९ अब्ज डॉलर होता. २०२३ च्या तुलनेत त्यात ३८ टक्के वाढ झाली. २०१५ पेक्षा तो दुप्पट झाला. रशियाच्या जीडीपीच्या ७.१ टक्के खर्च संरक्षणावर केला जात आहे, तर युक्रेनचा संरक्षणावरील खर्च २.९ टक्क्याने वाढला असून तो ६४.७ अब्ज डॉलर झाला आहे. युक्रेनचा जीडीपीच्या ३४ टक्के संरक्षण खर्च आहे. हे प्रमाण जगातील कोणत्याही देशांपेक्षा अधिक आहे, असे अहवालात म्हटले आहे.
रशिया, जर्मनीचा खर्च वाढला
युक्रेनसोबत युद्ध सुरू असल्याने रशियाने सातत्याने आपल्या लष्करी खर्चात वाढ केली आहे, असे ‘सिप्री’चे वरिष्ठ संशोधक डिएगो लोप्स डा सिल्वा यांनी सांगितले. मध्य व पश्चिम युरोपातील सर्व देशांच्या लष्करी खर्चात वाढ झाली आहे. जर्मनीने संरक्षण खर्चात २८ टक्के वाढ केली असून ते ८८.५ अब्ज डॉलरवर पोहचले आहे. जर्मनी हा मध्य व पश्चिम युरोपातील सर्वात मोठा संरक्षणावर खर्च करणारा देश ठरला आहे. पोलंडने लष्करी खर्चात ३१ टक्के वाढ केली असून त्याने ३८ अब्ज डॉलर २०२४ मध्ये खर्च केले, असे ‘सिप्री’ने अहवालात नमूद केले.