आता १०० टक्के शुद्ध इथेनॉल; सरकारने E100 इंधनाला दिली मंजुरी

रस्ते वाहतूक मंत्रालयाने सोमवारी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदल करत ई१०० (जवळपास शुद्ध इथेनॉल) पर्यंतच्या इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांना परवानगी देणारी अधिसूचना जारी केली आहे.
आता १०० टक्के शुद्ध इथेनॉल; सरकारने E100 इंधनाला दिली मंजुरी
आता १०० टक्के शुद्ध इथेनॉल; सरकारने E100 इंधनाला दिली मंजुरी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक मंत्रालयाने सोमवारी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदल करत ई१०० (जवळपास शुद्ध इथेनॉल) पर्यंतच्या इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांना परवानगी देणारी अधिसूचना जारी केली आहे. ई१०० इंधनामुळे वाहने जवळपास शुद्ध इथेनॉलवर चालण्यास सक्षम होतात. ई२० (२० टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल) पेक्षा जास्त आणि ई१०० पर्यंतचे इंधन हे केवळ त्यासाठी डिझाइन केलेल्या आणि प्रमाणित केलेल्या वाहनांसाठीच असेल आणि इतर वाहनांसाठी लागू होणार नाही, असे रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ई२० किंवा सामान्य इंधन वापरणारी वाहने ई८५ किंवा ई१०० इंधन वापरू शकत नाहीत.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काही वाहन वर्गीकरण मर्यादा, इंधन वैशिष्ट्ये आणि उत्सर्जन-संबंधित तक्त्या व चाचणी तरतुदींमध्ये वापरले जाणारे तांत्रिक संदर्भ बदलले आहेत. या बदलांमुळे प्रभावित झालेल्या हलक्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांसाठी सरकारने वाहनाच्या वजनाची मर्यादा पूर्वीच्या ३,००० किलोवरून वाढवून ३,५०० किलो केली आहे.

मका-आधारित इथेनॉलचा खरेदी दर वाढवा!

मका-आधारित इथेनॉलचा पुरवठा करणाऱ्यांसाठी तो फायदेशीर ठरावा यासाठी सरकारने मका-आधारित इथेनॉलचा खरेदी दर वाढवून प्रति लिटर ७५ रुपये करावा, अशी मागणी 'ऑल इंडिया डिस्टिलर्स असोसिएशन'ने सोमवारी केली. भारताच्या बायोइथेनॉल आणि मद्य निर्मिती उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या असोसिएशनने इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामसाठी एक स्पष्ट रोडमॅप तयार करण्याचीही मागणी केली.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने १६ ऑक्टोबर रोजी ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या वतीने एक निविदा जारी केली होती. यामध्ये नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पुरवठा वर्षासाठी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी ११ अब्ज लिटर इथेनॉलच्या बोली मागवण्यात आल्या होत्या. मका-आधारित इथेनॉलसाठीचे प्रोत्साहन कमी करत त्याचा खरेदी दर ७१.८६ रुपयांवरून घसरवून प्रति लिटर ६८.८६ रुपये करण्यात आला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in