
नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड वेगाने सुरू आहे. जपानला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची बनली आहे. आता भारताच्या पुढे केवळ अमेरिका, चीन व जर्मनी या तीन अर्थव्यवस्था आहेत.
नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम म्हणाले की, भारतासाठी चांगले वातावरण असून देशाची आर्थिक स्थिती मजबूत आहे. आर्थिक धोरणांमुळे भारताने हे स्थान मिळवले आहे, असे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीचा हवाला देऊन सुब्रह्मण्यम म्हणाले की, भारत आता चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. आता भारत ४ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनली आहे. आता भारताने जपानला मागे टाकले आहे. अमेरिका, चीन आणि जर्मनी हे भारतापेक्षा मोठे आहेत, असे त्यांनी सांगितले.
नीती आयोगाचे सीईओ म्हणाले की, आपण आपल्या धोरणावर कायम राहिल्यास तर येत्या अडीच ते तीन वर्षांत आपण तिसरी अर्थव्यवस्था बनू, असे त्यांनी ठामपणे सांगितले.