भारताची २६ राफेल खरेदी! फ्रान्समधून मरीन लढाऊ विमाने येणार; भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार, ६४ हजार कोटी रुपयांचा करार

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणारा करार फ्रान्ससोबत करण्यात आल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.
भारताची २६ राफेल खरेदी! फ्रान्समधून मरीन लढाऊ विमाने येणार; भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार, ६४ हजार कोटी रुपयांचा करार
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणारा करार फ्रान्ससोबत करण्यात आल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात सोमवारी भारतीय नौदलासाठी सुमारे ६४ हजार कोटी रुपये किमतीच्या २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदी करारावर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब झाले.

या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय नौदलासाठी २६ अत्याधुनिक राफेल-मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली होती. या स्पर्धात्मक प्रक्रियेत अमेरिकन बोइंग एफ/ए १८ सुपर हॉर्नेटचाही समावेश होता. पण भारतीय नौदलाने राफेल लढाऊ विमानांची निवड केली. राफेल हे भारतीय आवश्यकतेनुसार अधिक योग्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे राफेलची निवड करण्यात आली आहे.

ही राफेल विमाने अत्याधुनिक शस्त्र प्रणालींनी सुसज्ज असतील. यात लांब पल्ल्याची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध यांचा समावेश असेल. या करारानुसार भारतात विमाननिर्मिती करणे अनिवार्य नसले, तरी राफेलमध्ये सहभागी असलेल्या डसॉल्ट, थेल्स आणि एमबीडीएसारख्या फ्रेंच कंपन्या त्यांच्या भारतीय भागीदारांना स्थानिक पातळीवर उपकरणे आणि उपप्रणाली निर्मितीसाठी ऑर्डर देण्याची शक्यता आहे.

विक्रांतवर तैनात होणार

भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारानुसार भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल मरीन एअरक्राफ्ट खरेदी केले जाणार आहेत. भारताचे प्रतिनिधी आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी हा सौदा केला आहे. यावेळी नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अॅडमिरल के. स्वामिनाथन उपस्थित होते. भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारानुसार २२ सिंगल-सीट आणि ४ ट्विन-सीट विमाने नौदलात सामील होणार आहेत. यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसणार आहे. कारण ही विमाने ‘आयएनएस विक्रांत’वर तैनात केली जाणार आहेत, १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानला अस्मान दाखवले होते. या जेटमुळे आता भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यान २०१६ मध्ये करार झाला होता. त्यानुसार आधीपासूनच भारतीय नौदलाच्या ताफ्यात ३६ एअरक्राफ्ट आहेत. भारतीय हवाई दलाची राफेल जेट अंबाला आणि हाशिनारा या दोन बेसवरून ऑपरेट होतील. या २६ राफेल-एमच्या डीलसोबतच भारताच्या राफेल जेटची संख्या वाढून ६२ होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in