पेट्रोल-डिझेल भरपूर, तेल कंपन्यांचा खुलासा; तुटवड्याच्या अफवा फेटाळल्या

पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी स्पष्ट केले की, भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल-डिझेल किंवा एलपीजीच्या तुटवड्याबाबतच्या अफवा त्यांनी फेटाळून लावल्या.
पेट्रोल-डिझेल भरपूर, तेल कंपन्यांचा खुलासा; तुटवड्याच्या अफवा फेटाळल्या
पेट्रोल-डिझेल भरपूर, तेल कंपन्यांचा खुलासा; तुटवड्याच्या अफवा फेटाळल्या
Published on

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी स्पष्ट केले की, भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल-डिझेल किंवा एलपीजीच्या तुटवड्याबाबतच्या अफवा त्यांनी फेटाळून लावल्या. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी 'इंडियन ऑइल कॉर्पोरेशन'ने (आयओसी) यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन'ने म्हटले आहे की, पेट्रोल किंवा डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. ऑनलाइन पसरणाऱ्या अफवांमुळे अनावश्यक चिंता निर्माण होऊ शकते आणि पुरवठ्याच्या सामान्य पद्धतींमध्ये अडचणी येऊ शकतात. इंडियन ऑइलच्या विक्री केंद्राकडे पुरेसा साठा उपलब्ध असून ती पूर्णपणे कार्यरत आहेत. त्यामुळे "घाबरून खरेदी करणे टाळावे आणि फक्त योग्य माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन लोकांना कंपनीकडून करण्यात आलं आहे. अफवांमुळे अनावश्यक चिंता निर्माण होऊ शकते आणि पुरवठ्याच्या सामान्य पद्धतींमध्ये व्यत्यय येऊ शकतो, असा इशाराही 'इंडियन ऑइल कॉर्पोरेशन'ने दिला आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनेही (बीपीसीएल) आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशाच प्रकारचे एक निवेदन जारी केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा असून, पुरवठा साखळी सामान्यपणे सुरू आहे. दरम्यान, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या निवेदनाचा उद्देश जनतेची चिंता कमी करणे आणि अनावश्यक घबराटीने होणारी खरेदी टाळणे हा आहे.

देशभरात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही, अशी ग्वाही हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनेही (एचपीसीएल) निवेदनाद्वारे ग्राहकांना दिली आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. इंधनाचा पुरवठा स्थिर असून, पुरेसा साठा उपलब्ध आहे. ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये किंवा घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये, असा सल्ला देण्यात येत आहे. याचबरोबर, "कृपया आपला इंधनाचा वापर नेहमीप्रमाणेच सुरू ठेवावा. आपल्या संपूर्ण नेटवर्कमध्ये इंधनाचा अखंड आणि सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी बीपीसीएल कटिबद्ध आहे, असेही म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in