नवी दिल्ली : जगात आर्थिक मंदी सुरू असतानाच भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगाने वाटचाल सुरू आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर (जीडीपी) ८.४ टक्के नोंदवला गेला आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने २९ फेब्रुवारीला जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वेगाने वाढले आहे. तिसऱ्या तिमाहीतील ८.४ टक्क्यांचा हा वृद्धीदर २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीनंतरचा सर्वात चांगला वृद्धीदर आहे. जो ६.६ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा खूप अधिक आहे.
केंद्र सरकारने चालू वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे जाहीर केले. अर्थव्यवस्थेची वाढ ही अंदाजापेक्षा खूप अधिक आहे. देशातील उत्पादन वाढ व आणि सरकारी खर्चातील तेजी यामुळे जीडीपीचा वेग वाढला आहे. या पूर्वीच्या तिमाहीतील जीडीपी वाढ ७.६ टक्के होती.
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. जागतिक बँकेपासून जागतिक नाणेनिधीपर्यंत सर्वांनीच तिचे कौतुक केले आहे. आता तिसऱ्या तिमाहीचे आकडेही हेच दर्शवत आहेत.
अर्थव्यवस्थेची ताकद दिसली-पंतप्रधान
८.४ टक्के जीडीपी यातून भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद व आमची क्षमता दिसून आली आहे. आर्थिक विकास वेगाने करण्याचे आमचे प्रयत्न आणखीन वाढतील. त्यामुळे १४० कोटी भारतीयांना चांगले राहणीमान व विकसित भारत निर्माण करण्यात मदत मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, जीडीपी वाढलेला असला तरीही वित्तीय तूट जानेवारीपर्यंत ११ लाख कोटींवर गेली आहे. केंद्र सरकारच्या लक्ष्याच्या ६३.६ टक्क्यांपर्यंत वित्तीय तूट पोहोचली आहे.