सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला; चांदीचा भावही वाढला

मंगळवारी सोने-चांदीच्या दराने उसळी घेतली...
सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला; चांदीचा भावही वाढला

मुंबई : राष्ट्रीय राजधानीत मंगळवारी सोने-चांदीच्या दराने उसळी घेतली. सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ८०० रुपयांनी वाढून ६५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचला असून हा सार्वकालिक उच्चांक आहे. तर चांदीचा दर ९०० रुपयांनी वधारून ७४,९०० रुपये प्रति किलो झाला. चांदीचा दर सोमवारी ७४ हजार रु. प्रति किलो होता, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईत शुद्ध सोन्याचा दर ६५ हजारांजवळ जात ६४,५९८ रु. झाला. तर चांदी ७२,२४४ रु. प्रति किलो झाली. तर आंतरराष्ट्रीय बााजारात सोन्याचे दर सोमवारच्या तुलनेत १ टक्क्यांहून अधिक वधारून २,११० अमेरिकन डॉलर्स प्रति औंस तर चांदीचा दर २३.८८ अमेरिकन डॉलर्स प्रति औंस झाले. मागील व्यवहारात हा दर २३.०९ डॉलर्स औंस होता.

फेब्रुवारीमध्ये सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली होती. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ फेब्रुवारीला सोन्याचा भाव ६२,७७५ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो २९ फेब्रुवारीला ६२,२४१ रुपयांवर आला. म्हणजेच गेल्या महिन्यात त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५३४ रुपयांनी घसरली. तर चांदीचा भावही ७१,१५३ रुपये प्रति किलोवरून घसरून ६९.३१२ रुपयांवर आला होता.

सोने-चांदीचे दरवाढीचे कारण म्हणजे अमेरिकेत औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीत घट होण्याबरोबरच भू-राजकीय तणाव ही होत.

सोन्याच्या दरामध्ये तेजीची कारणे...

सोन्याच्या दरातील वाढीमागे काही प्रमुख आर्थिक घटक कारणीभूत ठरली. त्यात फेब्रुवारीमध्ये सलग १६ व्या महिन्यात यूएस उत्पादन क्षेत्राची घसरण झाली तर यूएस महागाई, अमेरिकी डॉलरचे मूल्य आणि ट्रेझरी उत्पन्नातील घट यासारख्या घटकांचा समावेश होता. विशेष म्हणजे वाढीव व्याजदर आणि इक्विटी मार्केटमध्ये चांगली कामगिरी होऊनही सोन्याच्या दरात जोरदार वाढ दिसून येत आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणाव यासह विविध कारणांमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे कमोडिटी तज्ज्ञांचा अंदाज आहे.

सोन्याच्या किमती ‘यावर’ अवलंबून

सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील. सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतील. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होईल.

logo
marathi.freepressjournal.in