
नवी दिल्ली : भारतातील सरकारी तेल शुद्धीकरण कंपन्यांनी सध्या रशियन कच्च्या तेलाची खरेदी थांबवली आहे, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या व्यक्तींच्या हवाल्याने ‘ब्लूमबर्ग’ने वृत्त दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतीय आयातीवर २५% अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, असे वृत्त आहे.
‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी सध्या खुल्या बाजारातून रशियन तेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील करार करण्यापूर्वी कंपन्या भारत सरकारकडून सूचनांची वाट पाहत आहेत.
सवलतीच्या पर्यायांचा विचार
‘ब्लूमबर्ग’च्या दुसऱ्या एका वृत्तानुसार, नवी दिल्लीतील अधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५०% कर लावण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेला कोणत्या व्यापार सवलती देऊ शकता येतील, यावर पर्याय शोधत आहेत. पुढील पावले उचलताना, भारत अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याची शक्यता पाहत आहे. अमेरिकेच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या, परंतु स्थानिक शेतकऱ्यांना हानी पोहोचू नये अशा प्रकारे मर्यादित व्यापार सवलती देता येतील का, याचा अधिकारी आढावा घेत आहेत.
भारत हार मानणार नाही
सध्या, भारतातील एकूण तेल आयातीपैकी रशियन तेलाचा वाटा सुमारे ३६% आहे, ज्यामुळे रशिया त्याचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे. अमेरिकेकडून वाढत्या दबावाला न जुमानता, भारत लगेच हार मानण्याची शक्यता नाही. मोदी सरकार मध्य-पूर्वेकडून अधिक तेल खरेदी करण्यावर आपले लक्ष केंद्रित करू शकते. पण, रशियन तेलावरील अवलंबित्व कमी करण्याची शक्यता कमी आहे.