
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला तावी नदीतील पूरस्थितीबाबत मानवतेच्या आधारावर इशारा दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जल करार निलंबित असतानाही ही माहिती पोहोचवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे दिली. त्यानंतर ती पाकपर्यंत पोहोचवण्यात आली, असे जलशक्ती मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. सिंधु करार निलंबित होण्यापूर्वी भारत हा पाकिस्तानसोबत अशा माहितीची देवाणघेवाण करत असे. मात्र, या वेळी हे पाऊल केवळ मानवी आधारावर उचलण्यात आले,” असे सूत्रांनी स्पष्ट केले. तावी नदीचा उगम हिमालयात होऊन ती जम्मू विभागातून वाहत जाऊन पाकिस्तानमधील चिनाब नदीला मिळते.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे सीमापार दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा पर्यटकांचा, मृत्यू झाला होता. तेव्हापासून भारत-पाकचे संबंध कमालीचे ताणले असून भारताने दशकांपासून अस्तित्वात असलेला सिंधू जल करार निलंबित केला आहे. सिंधू जल कराराद्वारे १९६० पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू नदी व तिच्या उपनद्यांच्या वापराबाबत नियम घालण्यात आले होते.