

नवी दिल्ली : सोने, चांदी, प्लॅटिनम आदी मौल्यवान धातूंच्या आयात शुल्कात मोठी वाढ केल्यानंतर सरकारने ‘अॅडव्हान्स ऑथरायझेशन’ योजनेंतर्गत सोने आयातीवर १०० किलोची मर्यादा घातली आहे.
सोने दागिने निर्यातदारांना कच्चा माल किंवा इतर शून्य शुल्कात आयात करण्याची परवानगी या योजनेअंतर्गत मिळते. सरकारने सोन्याच्या आयातीसाठी अॅडव्हान्स ऑथरायझेशन जारी करण्याच्या आणि त्यावर लक्ष ठेवण्याच्या अटी आता कडक केल्या आहेत. यापूर्वी या योजनेअंतर्गत सोने आयातीवर कोणतीही मर्यादा नव्हती.
आता सोन्याच्या आयातीसाठी ‘एडव्हान्स ऑथरायझेशन’ योजनेत जास्तीत जास्त १०० किलो मर्यादेच्या अधीन राहून जारी केले जाईल, असे ‘विदेश व्यापार महासंचालनालयाने’ (डीजीएफटी) सार्वजनिक नोटिसीत म्हटले आहे. पहिल्यांदा अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या बाबतीत, त्या युनिटचे अस्तित्व, क्षमता आणि कार्यात्मक स्थिती सत्यापित करण्यासाठी अर्जदाराच्या उत्पादन सुविधेची सक्तीची प्रत्यक्ष तपासणी केली जाईल.
सोन्याच्या आयातीसाठी कोणतेही पुढील अॅडव्हान्स ऑथरायझेशन किमान ५० टक्के निर्यात दायित्व पूर्ण केल्यानंतरच जारी करण्यासाठी विचारात घेतले जाईल. अॅडव्हान्स ऑथरायझेशनधारकाला दर पंधरवड्याला कामगिरी अहवाल सादर करावा लागेल.
स्वतंत्र चार्टर्ड अकाऊंटंटने प्रमाणित केलेल्या या अहवालात आयात आणि निर्यात केलेल्या सोन्याचे तपशील असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित प्रादेशिक प्राधिकरण अॅडव्हान्स ऑथरायझेशन जारी करण्याबाबतचा मासिक अहवाल डीजीएफटीला सादर करेल.