पायाभूत सुविधा प्रकल्पांचा खर्च वाढला; ऑक्टोबरमध्ये ३.२८ लाख कोटींची वाढ

१५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या खर्चात ३,२८,४५२ कोटी रुपयांची एकत्रित वाढ नोंदवण्यात आली आहे.
पायाभूत सुविधा प्रकल्पांचा खर्च वाढला;  ऑक्टोबरमध्ये ३.२८ लाख कोटींची वाढ
पायाभूत सुविधा प्रकल्पांचा खर्च वाढला; ऑक्टोबरमध्ये ३.२८ लाख कोटींची वाढ'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवी दिल्ली : १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या खर्चात ३,२८,४५२ कोटी रुपयांची एकत्रित वाढ नोंदवण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२६ च्या सरकारी मासिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

१७ केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमधील १,८६२ सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांचा मूळ खर्च ३४,८२,८४० कोटी रुपये होता. तो आता सुधारित होऊन ३८,११,२९२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र नेमक्या किती प्रकल्पांचा खर्च वाढला आहे याची नेमकी संख्या अहवालात नमूद केलेली नाही.

या प्रकल्पांवर आतापर्यंत एकत्रितपणे १७.८७ लाख कोटी रुपये खर्च झाले असून हे प्रमाण एकूण प्रकल्प खर्चाच्या ४६.८८ टक्के आहे. प्रकल्प अंमलबजावणीत सातत्यपूर्ण प्रगती होत असल्याचे यातून दिसून येते, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने बुधवारी ऑक्टोबर महिन्याच्या अहवालात म्हटले आहे.

मोठ्या प्रमाणावर प्रकल्प प्रगत टप्प्यावर आहेत. यामध्ये ६४९ प्रकल्पांनी (३५ टक्के) ८० टक्क्यांहून अधिक प्रत्यक्ष प्रगती साधली आहे. तर ३२६ प्रकल्पांनी (१८ टक्के) ८० टक्क्यांहून अधिक आर्थिक पूर्तता गाठली आहे.

प्रकल्पांची स्थिती :

  • रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय : सर्वाधिक ९७२ प्रकल्प (एकूण प्रकल्पांच्या ५२ टक्के) असून, त्यांचा सुधारित खर्च ९.५५ लाख कोटी रुपये (एकूण खर्चाच्या २५ टक्के) आहे.

  • रेल्वे मंत्रालय : २८८ प्रकल्प (१५ टक्के) असून, त्यांचा सुधारित खर्च ७.३८ लाख कोटी रुपये (१९ टक्के) आहे.

  • कोळसा मंत्रालय : १२१ प्रकल्प (७ टक्के) असून, त्यांचा सुधारित खर्च २.२२ लाख कोटी रुपये(६ टक्के) आहे.

  • इतर प्रमुख मंत्रालये : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय (११७ प्रकल्प; खर्च ४.४२ लाख कोटी), ऊर्जा मंत्रालय (१०८ प्रकल्प; खर्च ६.५५ लाख कोटी), गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (५० प्रकल्प; खर्च ३.४४ लाख कोटी) आणि जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन विभाग (३३ प्रकल्प; खर्च १.९३ लाख कोटी).

  • उर्वरित १७३ प्रकल्प (९ टक्के) ज्यांचा एकूण खर्च २.६३ लाख कोटी रुपये (७ टक्के) आहे, ते उच्च शिक्षण, नागरी विमान वाहतूक, पोलाद, दूरसंचार, कामगार व रोजगार, बंदरे व जलमार्ग, आरोग्य व कुटुंब कल्याण, खाण, डीपीआयआयटी आणि क्रीडासारख्या मंत्रालये व विभागांमध्ये विभागलेले आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)