

नवी दिल्ली : भारताच्या जनतेकडून दान करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप शनिवारी 'रेड क्रेसेंट सोसायटी ऑफ इराण'कडे रवाना करण्यात आली. याबद्दल इराणने आभार मानले असून भारत हा अत्यंत विश्वासू आणि माणुसकीला जागणारा मित्र असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
त्यांच्या मते, हा पुढाकार या कठीण काळात इराणच्या जनतेशी आणि सरकारशी भारताने जी सहानुभूती व ऐक्याची भावना दर्शवली ती प्रशंसनीय आहे, असे इराणचे भारतातील राजदूत महमंद फाथली यांनी सांगितले. भारतीय जनतेने औषधे खरेदी करण्यासाठी जे स्वयंस्फूर्त योगदान केले त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
भारतीय नागरिकांच्या प्रशंसनीय पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, इराणी दूतावासाने शुक्रवारी आर्थिक देणग्या स्वीकारण्यासाठी सुरू केलेली खाती बंद केली. दूतावासाने आता यापुढे कोणत्याही खात्यात निधी हस्तांतरित न करण्याची विनंती केली आहे.
विशेषतः काश्मीरमधील जनतेने दाखवलेल्या मानवतावादी पाठिंब्याबद्दल दूतावासाने आम्ही तुमची दयाळू वृत्ती कधीही विसरणार नाही, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.