भारत धैर्याने दहशतवाद चिरडतोय! ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींची २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली

भारत धैर्याने दहशतवाद चिरडतोय! ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींची २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली

पंतप्रधानांनी यावेळी २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. २६/११ चा दिवस भारतासाठी आणखी महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी भारताची राज्यघटना स्वीकारली गेली.

नवी दिल्ली : २६/११ चा दहशतवादी हल्ला भारत कधीही विसरणार नाही. दहशतवाद्यांनी मुंबई व देशाला हादरवून सोडले होते. या हल्ल्यातून सावरत भारत आता दहशतवादाला धैर्याने चिरडत आहे, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘मन की बात’मध्ये मोदी यांनी विविध विषयावर आपली मते मांडली.

पंतप्रधानांनी यावेळी २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. २६/११ चा दिवस भारतासाठी आणखी महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी भारताची राज्यघटना स्वीकारली गेली. २०१५ मध्ये २६ नोव्हेंबरचा दिवस राज्यघटना दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा आमच्या सरकारने केली. भारताची राज्यघटना निर्माण करायला दोन वर्षे ११ महिने व १८ दिवसांचा कालावधी लागला. ६० हून अधिक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर राज्यघटनेचा मसुदा तयार झाला. त्याला अंतिम स्व‌रूप देण्यापूर्वी त्यात दोन हजारांहून अधिक संशोधनं केली. १९५० मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतर आतापर्यंत त्यात १०६ सुधारणा झाल्या आहेत.

प्रोजेक्ट सुरतचे कौतुक

सुरतमध्ये तरुणांनी ‘प्रोजेक्ट सुरत’ मोहिमेची सुरुवात केली. त्याचे लक्ष्य सुरतची सफाई व विकास करणे हा होता. या प्रकल्पांतर्गत तरुण सार्वजनिक जागांची सफाई करतात. आता सफाई करणाऱ्या तरुणांची संख्या ५० हजारांवर गेली आहे. या तरुणांनी आतापर्यंत लाखो किलो कचरा उचलला आहे.

भारतात पेटंटचे अर्ज वाढले

भारतात २०२२ मध्ये भारतीयांकडून पेटंटचे अर्ज वाढले आहेत. जागतिक इंटेलेक्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनने एक अहवाल जारी केला आहे. त्यात पेटंट सादर करण्यात पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा क्रमांक आहे. सरकारने ज्या प्रशासनिक व कायदेशीर सुधारणा केल्या आहेत त्यानंतर देशातील तरुण हे संशोधनात गुंतले आहेत.

परदेशात विवाहाची गरज काय?

काही कुटुंबे परदेशात जाऊन विवाह करत आहेत. त्याची गरज काय? असा सवाल पंतप्रधानांनी केला. भारतात भारतीय लोक विवाह करतील तर देशाचा पैसा येथेच राहील. छोटे छोटे गरीब लोक आपल्या मुलांना तुमच्या लग्नाच्या गोष्टी सांगतील, असे पंतप्रधान म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in