भुज : भारतात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची आवश्यकता नाही. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी मंगळवारी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक गुजरातमधील भूजमध्ये पार पडली. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. भारत हिंदू राष्ट्र केव्हा बनणार, या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना होसबळे यांनी भारत हिंदू राष्ट्र आधीही होता, आजही आहे आणि नेहमीच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी होसबळे यांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या एका ऐतिहासिक वक्तव्याचे उदाहरणही दिले. हेडगेवार म्हणाले होते, ‘मी हिंदू आहे असे म्हणणारा एकही व्यक्ती जोवर या भूमीवर आहे, तोवर भारत हिंदू राष्ट्र राहणार.’ आपल्या उत्तरात आणखी स्पष्टता आणण्यासाठी होसबळे यांनी संविधानानुसार असलेली राज्यपद्धती म्हणजेच स्टेट सिस्टम आणि राष्ट्र (नेशन) यांच्यात काय फरक आहे, हेही खुलासेवार सांगितले. भारतावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते, तेव्हा ते ब्रिटिश राज होते. मात्र, तेव्हाही राष्ट्र म्हणून भारत हिंदू राष्ट्रच होता, असे होसबळे म्हणाले.
आपला देश, समाज, संस्कृती, धर्म यासाठी काहीतरी चांगलं करण्याची भावना असणे हेच हिंदुत्व आहे आणि याच हिंदुत्वाची जाणीव व्हावी यासाठी संघ कार्य करत आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याची गरज नसून भारत हिंदू राष्ट्रच आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.