नुसतं नावात इंडिया असून उपयोग नाही!

पंतप्रधानांच्या विधानाचा आधार घेत भाजपच्या अनेक नेत्यांनीही या वादात उडी घेतली
नुसतं नावात इंडिया असून उपयोग नाही!
Published on

नवी दिल्ली : देशातील २६ विरोधी पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या आघाडीच्या इंडिया नावावरून मंगळवारी गदारोळ माजला. नुसतं नावात इंडिया असून काही उपयोग नाही. ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीन, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्या नावातही इंडिया शब्द आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. त्यावर मोदी आम्हाला काहीही म्हणोत. आम्ही मणिपूरच्या जनतेच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम करू. मणिपूरमध्ये खऱ्या भारताची संकल्पना रूजवू, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर दिले.

देशातील २६ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नुकत्याच स्थापन केलेल्या राजकीय आघाडीला 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स' असे नाव दिले आहे. त्यांची आद्याक्षरे घेऊन 'इंडिया' असे लघुरूप बनवले आहे. या नावावारून पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी विरोधकांची खिल्ली उडवली. राजधानी दिल्लीत भाजपच्या खासदारांना संबोधित करताना मोदी यांनी म्हटले की, संघटनेच्या नावात नुसते इंडिया असून भागत नाही. भारतावर राज्य करणारी ब्रिटिश व्यापारी कंपनी ईस्ट इंडिया कंपनी, मुस्लीम दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीन आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्या नावांतही इंडिया शब्द आहे. विरोधकांनी केवळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी इंडिया शब्दाचा वापर केला आहे. मी आजच्या इतके संभ्रमित झालेले विरोधक कधी पाहिले नव्हते. पंतप्रधानांच्या विधानाचा आधार घेत भाजपच्या अनेक नेत्यांनीही या वादात उडी घेतली.

वक्तव्यावरून वादंग : खर्गेंची टीका

पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून मंगळवारी जोरदार वादंग माजले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही मोदी यांच्या विधानाचा समाचार घेतला. आम्ही संसदेत मणिपूरविषयी बोलत आहोत आणि पंतप्रधान संसदेच्या बाहेर आम्हाला ईस्ट इंडिया कंपनी म्हणून हिणवत आहेत. काँग्रेस पक्ष देशवासीयांसाठी नेहमीच भारतमातेच्या भूमिकेत राहिला आहे. उलट भाजपचे राजकीय पूर्वज ब्रिटिशांचे गुलाम होते. पंतप्रधान मोदी, तुम्ही शब्दच्छल करून देशाचे लक्ष विचलित करू नका. मणिपूरबद्दल संसदेत बोला. भारताला टीकेचे लक्ष्य बनवून पंतप्रधानपदाचा सन्मान कमी करू नका, अशा शब्दांत खर्गे यांनी मोदी यांना उत्तर दिले.

पंतप्रधान भारताची तुलना दहशतवादी संघटनेबरोबर करत आहेत ही दु:खदायक बाब आहे, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in