बीजिंग : भारताने एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची (आयएडीडब्लूएस) यशस्वी चाचणी केली असून त्यातील उच्च क्षमतेचे लेझर हे अधिक भेदक आहे, असे चीनी लष्करी तज्ज्ञाने म्हटले आहे.
आयएडीडब्लूएस बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली असून त्यात स्वदेशी क्विक रिऍक्शन सरफेस-टू-एअर मिसाईल्स (क्यूआरएसएएम), लघू पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्रे आणि उच्च क्षमतेच्या लेझर प्रणालीचा समावेश आहे.
ही स्वदेशी हवाई संरक्षण प्रणाली शनिवारी ओडिशा किनाऱ्यावरून उड्डाण चाचणीसाठी वापरण्यात आली.
विशेषतः उच्च क्षमतेची प्रणाली चीनसह अमेरिका, रशिया, ब्रिटन, जर्मनी आणि इस्रायल यांसारख्या काही मोजक्या देशांकडेच उपलब्ध असल्याने चीनी तज्ज्ञांचे लक्ष या भारतीय चाचणीकडे वेधले गेले.
भारतीय हवाई संरक्षण प्रणाली असून ती ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवर उडणारी विमाने अशा कमी व मध्यम उंचीवरील लक्ष्यांना मर्यादित पल्ल्यात निष्प्रभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, असे बीजिंगस्थित एअरोस्पेस नॉलेज मासिकाचे मुख्य संपादक वांग यानान यांनी चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ला सांगितले.
अशा एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीचे मुख्य बलस्थान म्हणजे उच्च कार्यक्षम माहिती प्रणाली. ती लक्ष्यांची माहिती संबंधित शस्त्र घटकांकडे वितरित करू शकली पाहिजे. अन्यथा ही प्रणाली फक्त स्वतंत्रपणे काम करणाऱ्या वेगवेगळ्या संरक्षण शस्त्रांचा समूह ठरेल,” असे ते म्हणाले.
“आयएडीडब्यूएस’ च्या तीन थरांपैकी वाहन-आधारित क्यूआरएसएएम व मानवरहित शस्त्रास्त्र तंत्रज्ञानदृष्ट्या नवी नाहीत, परंतु लेझर प्रणालीला खरोखरच महत्त्वपूर्ण प्रगती मानली पाहिजे,” असे वांग यांनी स्पष्ट केले.“लढाईसाठी लेझर प्रणाली तैनात केलेले जगात फक्त काहीच देश आहेत,” असे वांग यांनी सांगितले.
चीनची एलडब्यू-३० ही वाहन-आधारित लेझर संरक्षण प्रणाली, जी ड्रोनासाठी ‘किलर’ मानली जाते, त्याचे त्यांनी उदाहरण दिले. या प्रणालीत प्रकाशाच्या गतीने हल्ला, वेगाने आक्रमण, सतत कार्यरत राहण्याची क्षमता, लवचिक व अचूक ऑपरेशन आणि उच्च कार्यक्षमता यांसारखी वैशिष्ट्ये आहेत, असे त्यांनी सांगितले.
चीनी तज्ज्ञांच्या या प्रतिक्रिया लक्षणीय मानल्या जात आहेत कारण चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी ही आधुनिक शस्त्रास्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करते तसेच पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पुरवते.
स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थाच्या अलीकडील अहवालानुसार, पाकिस्तानकडे असलेल्या लष्करी साधनसामग्रीपैकी ८१ टक्क्यांहून अधिक चीनकडून पुरवण्यात आली. अलीकडील ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान लष्कराने ती भारताविरुद्ध वापरण्याचा प्रयत्न केला होता.