

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. इराणने भारताचा ध्वज असलेल्या दोन एलपीजी जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग (सेफ पॅसेज) देण्यास परवानगी दिली आहे. या जहाजांमध्ये 'शिवालिक' आणि 'नंदा देवी' या जहाजांचा समावेश असून ते भारतासाठी द्रवरूप पेट्रोलियम वायू घेऊन येत आहेत. हे दोन्ही टँकर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. या टँकरमधून ९२ हजार ७०० मेट्रिक टन एलपीजी भारतात येत आहे.
पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. या संघर्षानंतर इराणने अनेक देशांच्या जहाजांवर निर्बंध लावले होते आणि या मार्गावरून जाणारी वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. होर्मुझ सामुद्रधुनी हाजागतिक ऊर्जा पुरवठ्याचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि गॅस वाहतूक या मार्गाने होते. त्यामुळे या मार्गावरील कोणतीही अडचण जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम करू शकते.
भारत आणि इराण यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर ही परवानगी मिळाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांच्यात ऊर्जा पुरवठा आणि व्यापार सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाल्यानंतर ही सकारात्मक घडामोड घडल्याचे वृत्त आहे. भारतासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण भारत आपल्या एलपीजी आयातीपैकी सुमारे ९० टक्के पुरवठा मध्यपूर्व देशांकडून करतो. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यास भारतात गॅस पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या अनेक भारतीय जहाजे या परिसरात अडकून पडल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, या संकटामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे. अनेक देशांनी त्यांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. काही जहाजांवर हल्ल्यांच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे हा समुद्री मार्ग उच्च जोखमीचा क्षेत्र मानला जात आहे. एकूणच, या तणावपूर्ण परिस्थितीत भारताच्या जहाजांना दिलेला सुरक्षित मार्ग हा भारत-इराण संबंधांचा सकारात्मक परिणाम मानला जात आहे. या निर्णयामुळे भारतातील एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार असून ऊर्जा सुरक्षेबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.