मालदीव VS लक्षद्वीपच्या नादात नेत्याची फजिती झाली, 'हा' फोटो शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीनंतर मालदीव आणि भारत यांच्यात मोठा तणाव पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर यावरुन मोठे राण उठले आहे. अशातच मालदीवमधील सत्ताधारी पक्षाचे (प्रोग्रेसिव्ह पार्टी) एक नेते माइझ महमूद यांनी केलेल्या पोस्टवरून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. महमूद यांची पोस्ट व्हायरल झाली असून नेटकरी त्यांची खिल्ली उडवित आहेत. त्यामुळे महमूद यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली.
माइझ महमूद यांनी सोशल मीडियावर मालदीवच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक करत "मालदीवमधील सूर्यास्त, हे तुम्हाला लक्षद्वीपमध्ये पाहायला नाही मिळणार #VisitMaldives", असे लिहून एक पोस्ट केली. यात त्यांनी शेअर केलेल्या फोटोची लक्षद्वीपशी तुलना केली. तसेच, पंतप्रधान मोदींना टॅग करत पर्यटकांना मालदीवला भेट देण्याचे आवाहन केले. पण, हे करताना त्यांच्याकडून मोठी चूक झाली. खरंतर मालदीव म्हणून त्यांनी जे फोटो शेअर केले ते फ्रान्समधील निघाले आणि त्यांची चांगलीच फजिती झाली. चाणाक्ष नेटकऱ्यांनी ही गोष्ट लगेच हेरली आणि फ्रान्समधील पॉलिनेशियाच्या 'बोरा बोरा' बेटांचा फोटो असल्याचे सांगत महमूद यांना धारेवर धरले. अनेकांनी ट्रोल केल्यानंतर अखेर त्यांना आपली पोस्ट डिलीट करावी लागली.
नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली-
नेटकऱ्यांनी महमूद यांना अक्षरश: झोडपून काढले आहे. "फोटो टाकण्यापूर्वी एकदा गुगल करायला पाहिजे", अशी खिल्ली उडवली. एकाने तर, "हे मालदीवपासून 14800 किमी दूर असलेले बोरा बोरा आहे", असे म्हटले. तर दुसर्याने, ''हो. भारतात आम्ही सकाळी आणि संध्याकाळी फक्त सूर्योदय पाहतो'', असे सांगितले. अजून एका युजरने, ''हे मालदीव नसून ही स्वतःची तोडफोड आहे'', अशी कमेंट केली. तर अन्य एकाने, "सुधारणा करा - हा 'बोरा बोरा'मधील सूर्यास्त आहे. तुम्हाला मालदीवमध्ये बघायला नाही मिळणार. हे खरंच दु:खद आहे. बिचाऱ्याला फ्रान्समधील पोलिनेसियाच्या 'बोरा बोरा'चा फोटो मालदीवचा सांगावा लागत आहे", असा टोला लगावला आहे.
काय आहे प्रकरण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत भारतीयांना याठिकाणी भेट देण्याचे आवाहन केले होते. मोदींनी केलेली पोस्ट मालदीवच्या काही मंत्र्यांना, नेत्यांना चांगलीच झोंबली. यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. यावर भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटताच मालदीव सरकारने तीन मंत्र्यांना निलंबित केले. दरम्यान, यामुळे भारत-मालदीवमध्ये तणाव निर्माण झाला असून भारतात #BoycottMaldives मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय मालदीवला जाण्याचा बेत रद्द केल्याचे सोशल मीडियावर सांगत आहेत. याचा मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसेल असा अंदाज वर्तवला जात आहे.