मालदीवमध्ये १० मेनंतर लष्करी किंवा साध्या वेशात एकही भारतीय सैनिक नसेल ; चीनसह करार करताच मुईझू यांनी दिला इशारा

येत्या १० मेनंतर मालदीवमध्ये लष्करी गणवेशात किंवा साध्या वेशात एकही भारतीय सैनिक नसेल, असा इशारा मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांनी दिला आहे.
मालदीवमध्ये १० मेनंतर लष्करी किंवा साध्या वेशात एकही भारतीय सैनिक नसेल ; चीनसह करार करताच मुईझू यांनी दिला इशारा

माले : येत्या १० मेनंतर मालदीवमध्ये लष्करी गणवेशात किंवा साध्या वेशात एकही भारतीय सैनिक नसेल, असा इशारा मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांनी दिला आहे. विशेष म्हणजे मंगळवारी मालदीवने चीनबरोबर संरक्षण क्षेत्रातील सहकार्याचा करार केला असून त्याच दिवशी भारताला ही समज दिली आहे.

मालदीव द्वीपसमूह हिंदी महासागरातील व्यापारी मार्गांजवळ मोक्याच्या ठिकाणी वसला आहे. तसेच त्या परिसरात चीनच्या कारवाया वाढत आहेत. त्यामुळे तेथे भारताने ८८ सैनिक, डॉर्निअर प्रकारचे एक टेहळणी विमान आणि दोन हेलिकॉप्टर असे सैन्य तेनात केले होते. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांनी सत्तेवर आल्यावर भारतीय सैनिकांना मागे घेण्याची मागणी केली. त्यानुसार भारत आणि मालदीव यांच्यात या प्रश्नावर चर्चा सुरू होती. हे सैन्य मागे घेण्यासाठी मालदीवने भारताला १० मार्चपर्यंतची मुदत दिली होती. मालदीवमध्ये तैनात असलेले एक विमान आणि दोन हेलिकॉप्टर चालवण्यासाठी भारताने लष्करी गणवेशातील सैन्य मागे घेऊन २८ फेब्रुवारी रोजी साध्या वेशातील कर्मचारी पाठवले होते. मात्र, तेवढ्याने मुईझू यांचे समाधान झाले नाही. त्यांनी १० मेपर्यंत भारताने लष्करी किंवा साध्या वेशातील सर्व कर्मचारी परत घ्यावेत, असा इशारा दिला आहे.

मोहम्मद मुईझू यांचा भारतापेक्षा चीनकडे अधिक कल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप भेटीवरून दोन देशांत वाद निर्माण झालेला असताना मुईझू चीन भेटीवर गेले होते. मालदीवने मंगळवारी चीनबरोबर संरक्षण सहकार्याचा करार केला आहे. त्यानुसार चीन मालदीवला लष्करी सामग्री पुरवणार आहे. या करारानंतर लगेचच मुईझू यांनी भारताला सैन्यमाघारीचा इशारा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in