मुंबई : जागतिक तणाव, अस्थिरता, व्यापारातील अडथळे आणि पुरवठा साखळीतील बदलाच्या पार्श्वभूमीवर भारत हा जगासाठी ‘स्थिर दीपस्तंभ’ ठरू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
मुंबईत सुरू असलेल्या ‘इंडिया मेरिटाईम वीक २०२५’अंतर्गत आयोजित ‘मेरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’मध्ये मोदी बोलत होते. ते म्हणाले, भारत हा धोरणात्मक स्वायतत्तेचे, शांततेचे आणि सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक आहे. जेव्हा जागतिक परिस्थिती अस्थिर असते, तेव्हा जगाला एका स्थिर दीपस्तंभाची गरज भासते आणि भारत ती भूमिका समर्थपणे पार पाडू शकतो.
भारताची लोकशाही आणि विश्वासार्हता हीच आपली खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी म्हणाले की, देशातील सागरी आणि व्यापाराशी निगडित उपक्रम हा व्यापक दृष्टिकोनाचा भाग असून ‘इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’ या योजनेचा उल्लेख त्यांनी भविष्यातील व्यापारमार्ग नव्याने परिभाषित करणारे उदाहरण म्हणून केला.
भारताचा सागरी क्षेत्रातील विकास वेगाने आणि ऊर्जेने पुढे सरकत आहे. आज आपल्या बंदरांची गणना विकसनशील जगातील सर्वात कार्यक्षम बंदरांमध्ये होते आणि अनेक बाबतींत ती विकसित देशांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करत आहेत, असे मोदी म्हणाले.
डिजिटल तंत्रज्ञान
ते पुढे म्हणाले, शंभर वर्षांहून जुने वसाहतीकालीन नौकानयन कायदे आम्ही रद्द करून २१व्या शतकासाठी अनुरूप आधुनिक कायदे लागू केले आहेत. या नव्या कायद्यांमुळे राज्य समुद्री मंडळांची भूमिका अधिक सक्षम झाली असून बंदर व्यवस्थापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. ‘मेरिटाईम इंडिया व्हिजन’अंतर्गत आतापर्यंत १५० हून अधिक उपक्रम सुरू करण्यात आले असून त्यामुळे सागरी क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.
सागरी क्षेत्र महत्त्वाचे इंजिन
पंतप्रधानांनी सांगितले की, भारताच्या वाढीसाठी सागरी क्षेत्र हे एक महत्त्वाचे इंजिन ठरत आहे. मागील दशकात या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून व्यापार व पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. २१व्या शतकाचा एक चतुर्थांश कालावधी संपला आहे. पुढील २५ वर्षे अधिक निर्णायक असणार आहेत. त्यामुळे आमचा भर ब्ल्यू इकॉनॉमी आणि शाश्वत किनारी विकासावर आहे. ग्रीन लॉजिस्टिक्स, पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि किनारी औद्योगिक क्लस्टर्स यांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित करत आहोत. सागरी क्षेत्रातील पुढील पिढीच्या सुधारणा गतीमानपणे राबवल्या जात आहेत, असे ते म्हणाले.
इतिहास घडविला
हे वर्ष भारताच्या सागरी क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगून मोदी म्हणाले, भारताचे पहिले खोल पाण्यातील आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट हब – विझिंजम पोर्ट – यावर्षी कार्यान्वित झाले. जगातील सर्वात मोठे कंटेनर जहाज नुकतेच येथे दाखल झाले, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. २०२४-२५ आर्थिक वर्षात देशातील प्रमुख बंदरांनी विक्रमी मालवाहतूक हाताळून कार्यक्षमतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. कांडला बंदराने देशातील पहिले मेगावॅट-स्तरीय स्वदेशी हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू करून इतिहास घडवला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
७०० टक्के वाढ
भारताच्या प्रमुख बंदरांची क्षमता दुप्पट झाली असून जहाजांच्या ‘टर्नअराउंड टाइम’मध्ये मोठी घट झाली आहे. क्रूझ पर्यटनाला गती मिळाली असून अंतर्देशीय जलमार्गांवरील मालवाहतूक ७०० टक्क्यांनी वाढली आहे, असे मोदी यांनी नमूद केले. आपल्या कार्यरत जलमार्गांची संख्या फक्त तीनवरून वाढून ३२ इतकी झाली आहे. गेल्या दशकात आपल्या बंदरांचा वार्षिक निव्वळ नफा नऊपट वाढला आहे, असे ते म्हणाले.