हवामान अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर; हवामान खात्याचे महासंचालक मोहपात्रा यांची माहिती

गेल्या काही वर्षांपासून नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले. तसेच गणितावर आधारित हवामान अंदाजाची मॉडेल्स तयार झाली. त्याचा वापर हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी केला जातो. हवामान खात्याने अंदाजाची कक्षा पंचायत समितीपर्यंत नेली आहे. या परिसरातील १० चौरस किमीच्या परिसरात अंदाज पोहचवले जात आहे, असे मोहपात्रा म्हणाले.
हवामान अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर; हवामान खात्याचे महासंचालक मोहपात्रा यांची माहिती

नवी दिल्ली : हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करायला भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायला सुरुवात केली आहे, अशी माहिती हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली.

‘पीटीआय’शी बोलताना ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले. तसेच गणितावर आधारित हवामान अंदाजाची मॉडेल्स तयार झाली. त्याचा वापर हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी केला जातो. हवामान खात्याने अंदाजाची कक्षा पंचायत समितीपर्यंत नेली आहे. या परिसरातील १० चौरस किमीच्या परिसरात अंदाज पोहचवले जात आहे, असे ते म्हणाले.

भारतीय हवामान खात्याकडे ३९ डॉपलर हवामान रडार असून देशातील ८५ टक्के भागापर्यंत त्यांची व्याप्ती आहे. मोठ्या शहरात प्रत्येक तासाचे हवामान जाहीर केले जात आहे. सध्या आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा मर्यादित वापर करत आहोत. येत्या पाच वर्षात आमचे सर्व मॉडेल्स व तंत्रज्ञान हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर असेल. हवामान खात्याने १९०१ पासूनचे सर्व हवामान अंदाज रेकॉर्ड केले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेला त्याचा वापर करता येऊ शकतो, कृत्रिम बुद्धिमत्ता व गणिती अंदाजाची मॉडेल्स यांचा वापर करून अचूक अंदाज वर्तविला जाऊ शकतो, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, गावापर्यंत हवामान अंदाज पोहचवण्याचे मोठे आव्हान आहे. आम्ही कृषी, आरोग्य, नगर नियोजन, जल व पर्यावरण आदींच्या गरजा लक्षात घेऊन हवामानाची माहिती देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

‘एक देश-एक निवडणूक’च्या नियोजनासाठी हवामान अंदाज घ्या!

देशात ‘एक देश-एक निवडणुकी’चे नियोजन करताना हवामानाच्या अंदाजाचा विचार करावा, असे आवाहनही मोहपात्रा यांनी केले. सध्या निवडणुकीच्या काळात भारतात कमालीचे उष्ण वातावरण आहे. या निवडणुकीसाठी आम्ही विशेष अंदाज पुरवत आहोत. त्यातून अधिकाऱ्यांना चांगली तयारी करता येऊ शकते, असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या प्रस्तावित ‘एक देश-एक निवडणुकी’साठी कोणता कालावधी योग्य आहे, यावर ते म्हणाले की, याचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज घ्यावा. यंदा देशात उष्णतेच्या लाटेचे दिवस वाढणार आहेत, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच दिला आहे. उष्ण हवामानामुळे पाणी, थंडावा आदींचा विचार करावा.

logo
marathi.freepressjournal.in