एनसीईआरटीच्या पुस्तकांतून ‘इंडिया’ गायब सर्व पाठ्यक्रमांच्या पुस्तकांत आता ‘भारत’ उल्लेख

एनसीईआरटीच्या समितीने प्राचीन इतिहासाऐवजी अभिजात इतिहासाचा समावेश करण्याची शिफारस केली आहे
एनसीईआरटीच्या पुस्तकांतून ‘इंडिया’ गायब
सर्व पाठ्यक्रमांच्या पुस्तकांत आता ‘भारत’ उल्लेख
Published on

नवी दिल्ली : एनसीईआरटी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या समितीने आपल्या शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांमध्ये जेथे जेथे इंडिया शब्द आहे, तेथे तेथे भारत शब्द वापरण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस मान्य केली गेल्यास देशभरातील एनसीर्इआरटी अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडिया ऐवजी भारत नाव वापरण्यास शिकवले जाईल. एनसीईआरटीच्या समितीने त्यांच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया या नावाऐवजी भारत शब्दाचा वापर करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. एनसीईआरटीच्या समितीचे सदस्य सीआय आयजॅक यांनी पुढील पाठ्यपुस्तकांमध्ये इंडिया या नावाऐवजी भारत शब्द वापरलेला असेल, असे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपर्वी याबाबतचा प्रस्ताव आणला गेला होता तो आता मान्य करण्यात आला आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये देशाचे नाव इंडिया की भारत यावरुन चर्चा सुरु होत्या. जी २० परिषदेच्या काळात त्याचे प्रमाण वाढले होते. देशातील २६ राजकीय पक्षांच्या आघाडीने इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच इंडिया हे नाव स्वीकारल्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. जी २० परिषदेत राष्ट्रपतींनी पाठवलेल्या आमंत्रण पत्रांवर भारत असा उल्लेख होता. मात्र, इंडिया दॅट इज भारत असा उल्लेख संविधानाच्या पहिल्या कलमामध्ये असल्याने काही कालावधीनंतर चर्चा थांबल्या होत्या आता पुन्हा एकदा एनसीईआरटीच्या निर्णयामुळे त्या सुरू होण्याची शक्यता आहे.

प्राचीन नाही, अभिजात इतिहास शिकवणार

तसेच एनसीईआरटीच्या समितीने प्राचीन इतिहासाऐवजी अभिजात इतिहासाचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय इतिहासाची प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशा तीन टप्प्यात होणारी विभागणी देखील यापुढे होणार नाही. ब्रिटीश कालावधीत भारतीय इतिहास प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक असा विभागला गेला होता. एनसीईआरटीच्या समितीचे आयजॅक यांनी इंडिया शब्दाचा उल्लेख ईस्ट इंडिया कंपनी आणि १७५७ च्या प्लासीच्या लढाईनंतर होऊ लागला, असा दावा केला. भारत या शब्दाचा उल्लेख प्राचीन लेखांमध्ये मिळतो, असे ते म्हणाले. समितीने सर्वसंमतीने भारत नावाचा वापर करावा, अशी शिफारस केल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in