देशभरातील मोबाईलवर एकाच वेळी अलर्ट मेसेज; केंद्रीय आपत्कालीन विभागाने केलेली चाचणी यशस्वी

देशभरातील अँड्रॉईड आणि आयओएस स्मार्टफोनमध्ये शनिवारी अचानक एकाचवेळी अलर्ट आला आणि सर्वांचे फोन अलार्म वाजल्यासारखे वाजू लागले.
देशभरातील मोबाईलवर एकाच वेळी अलर्ट मेसेज; केंद्रीय आपत्कालीन विभागाने केलेली चाचणी यशस्वी
देशभरातील मोबाईलवर एकाच वेळी अलर्ट मेसेज; केंद्रीय आपत्कालीन विभागाने केलेली चाचणी यशस्वी
Published on

नवी दिल्ली : देशभरातील अँड्रॉईड आणि आयओएस स्मार्टफोनमध्ये शनिवारी अचानक एकाचवेळी अलर्ट आला आणि सर्वांचे फोन अलार्म वाजल्यासारखे वाजू लागले. यामुळे सुरुवातीला अनेकजण घाबरले आणि हे नेमके काय असा प्रश्न पडला. मात्र, काही वेळानंतर हा आपत्कालीन संदेश असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांनी निःश्वास सोडला.

भारताने आपल्या नागरिकांसाठी तत्काळ आपत्तीची माहिती देण्याबाबत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. शनिवारी देशव्यापी मोबाईल-आधारित आपत्ती संप्रेषण प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांच्या मोबाईलवर 'अत्यंत गंभीर इशारा' असा संदेश प्राप्त झाला. प्रत्यक्षात, स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट प्रणालीची देशभरात चाचणी सुरू आहे, त्यामुळे आपत्तीविषयक इशारे जलदगतीने नागरिकांपर्यंत पोहोचवता येतील.

संचार मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही प्रणाली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने सुचवलेल्या कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉलवर आधारित आहे. सध्या ती भारतातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असून, भौगोलिकदृष्ट्या निवडक भागातील मोबाईल वापरकर्त्यांना एसएमएसद्वारे आपत्ती आणि आपत्कालीन सूचना पाठवते.

सरकारने दोन दिवसांपूर्वीच मेसेज पाठवून लोकांना आवाहन केले होते की, टेस्टिंगचा मेसेज मिळाल्यास घाबरू नका. शनिवारचा मेसेज केवळ आपत्कालीन परिस्थितीत इशारा देणाऱ्या प्रणालीची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आला होता.

आजवर १३४ अब्ज संदेश

या प्रणालीचा वापर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी मोठ्या प्रमाणावर केला असून, नैसर्गिक आपत्ती, हवामान इशारे आणि चक्रीवादळांच्या काळात १९ हून अधिक भारतीय भाषांमध्ये आतापर्यंत १३४ अब्जांपेक्षा जास्त एसएमएस अलर्ट पाठवले गेले आहेत. त्सुनामी, भूकंप, वीज पडणे तसेच गॅस गळती किंवा रासायनिक धोका यांसारख्या मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितींमध्ये वेळेवर इशारे देण्यासाठी एसएमएससोबत सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

पेगाससची चर्चा

देशातील स्मार्ट फोनमध्ये एकाच वेळी अलर्ट येऊन फोन अलार्म वाजल्यासारखे वाजू लागल्याने सोशल मीडियावर पेगाससबद्दलची चर्चा सुरू झाली होती. हा मेसेज म्हणजे असाच तर काही प्रकार नाही ना अशी भीती अनेकांनी व्यक्त केली. पेगासस हे अत्यंत प्रगत आणि तितकेच धोकादायक स्पायवेअर आहे. पेगाससचा वापर जगभरातील अनेक सरकारांनी पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, राजकारणी आणि विरोधी नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी केल्याचा आरोप आहे. पूर्वी हे स्पायवेअर एखाद्या लिंकवर क्लिक करून फोनमध्ये शिरत असे. मात्र, आता हे 'शून्य-क्लिक' पद्धतीने काम करते. म्हणजेच, व्हॉट्सअॅपवर फक्त एक मिस कॉल किंवा मेसेज येऊनही हे फोन हॅक करू शकते. एकदा फोनमध्ये शिरल्यावर पेगासस फोनचे संदेश, कॉल, ईमेल, पासवर्ड, फोटो, व्हिडिओ, लोकेशन आणि अगदी कॅमेरा व मायक्रोफोनचा वापर करून गुप्तपणे माहिती चोरू शकते

logo
marathi.freepressjournal.in