नवी दिल्ली : भारत सरकारने रविवारी जी-२० परिषदेला प्रगती मैदानात उपस्थित आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना ‘भारतातील हजारो वर्षांपासूनची लोकशाहीची परंपरा’ नामक एक २६ पानी पुस्तिकेचे वितरण केले. जगभरातून परिषदेसाठी आलेल्या पत्रकारांना परिषदेच्या शेवटच्या दिवशी ही पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
पुस्तिकेतील मजकुराची सुरुवात सिंधू-सरस्वती संस्कृतीपासून होते. वेदकालीन स्थानिक स्वराज्य संस्था, भारतीय तत्त्वज्ञानाच्या पाया, रामायण आणि महाभारत ते भारतीय संविधानाचे लिखाण आणि आधुनिक भारतातील निवडणुका यांचा थोडक्यात उहापोह या पुस्तिकेत करण्यात आला आहे. तसेच भारत हे देशाचे अधिकृत नाव असल्याचेही या पुस्तिकेत अधोरेखित करण्यात आले आहे. भारत या नावाचा उल्लेख संविधानात देखील करण्यात आला आहे.
भारतात राज्य कारभारात जनतेची मते विचारात घेणे हे पूर्वापार काळापासून चालत आले आहे. भारतीय परंपरेनुसार लोकशाही म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य, विविध कल्पना मांडण्याचे स्वातंत्र्य, जनकल्याणासाठी सरकार आणि सर्वसमावेशी समाज असा अर्थ होतो. तसेच भारतीय लोकशाहीत सुसंवादाच्या मूल्यांवर भर दिला जातो, असे या पुस्तिकेत नमूद करण्यात आले आहे.