प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

देशात १ लाख एकशिक्षकी शाळा; ३३ लाख विद्यार्थ्यांना शिक्षण

देशभरात ३३ लाखांहून अधिक विद्यार्थी १ लाखांपेक्षा जास्त अशा एकशिक्षक शाळांमध्ये शिकत आहेत. या एकशिक्षकी शाळांची संख्या सर्वाधिक आंध्र प्रदेशात असून, सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी उत्तर प्रदेशात आहे, असे शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.
Published on

नवी दिल्ली : देशभरात ३३ लाखांहून अधिक विद्यार्थी १ लाखांपेक्षा जास्त अशा एकशिक्षक शाळांमध्ये शिकत आहेत. या एकशिक्षकी शाळांची संख्या सर्वाधिक आंध्र प्रदेशात असून, सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी उत्तर प्रदेशात आहे, असे शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशात एकूण १,०४,१२५ एकशिक्षकी शाळा होत्या. या शाळांमध्ये एकूण ३३,७६,७६९ विद्यार्थी शिकत होते. म्हणजेच सरासरी प्रत्येक शाळेत सुमारे ३४ विद्यार्थी शिकत होते.

'शिक्षणाचा हक्क कायदा, २००९' नुसार, प्राथमिक स्तरावर (इयत्ता १ ते ५) शिक्षक-विद्यार्थी प्रमाण ३०:१ आणि उच्च प्राथमिक स्तरावर (इयत्ता ६ ते ८) ३५ः१ असणे आवश्यक आहे.

देशातील सर्वाधिक "एकशिक्षक" शाळा आंध्र प्रदेशात आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि लक्षद्वीपचा क्रम लागतो. मात्र, विद्यार्थ्यांच्या नोंदणीच्या दृष्टीने पाहता उत्तर प्रदेश पहिल्या स्थानी आहे, तर झारखंड, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश पुढील क्रमांकावर आहेत.

२०२२-२३ मध्ये अशा शाळांची संख्या १,१८,१९० होती, जी २०२३-२४ मध्ये घटून १,१०,९७१ झाली. म्हणजे सुमारे ६ टक्क्यांची घट झाली आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘शिक्षणातील गुणवत्तावाढ आणि उपलब्ध संसाधनांचा सर्वोत्तम वापर साधण्यासाठी सरकार शाळा एकत्रीकरण आणि विलीनीकरण मोहिमेवर भर देत आहे, ज्याला ‘शाळांचे सुसूत्रीकरण’ म्हटले जाते.’

ते पुढे म्हणाले, ‘एकशिक्षक शाळा शिक्षण-शिकवणी प्रक्रियेला अडथळा ठरतात. त्यामुळे ज्या शाळांमध्ये विद्यार्थी नाहीत, त्या शाळांतील शिक्षकांना एकशिक्षक शाळांमध्ये पुनर्नियुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’

आंध्र प्रदेशात १२,९१२, उत्तर प्रदेशात ९,५०८, झारखंडमध्ये ९,१७२, महाराष्ट्रात ८,१५२, कर्नाटकात ७,३४९, लक्षद्वीप व मध्य प्रदेशात प्रत्येकी ७,२१७, पश्चिम बंगालमध्ये ६,४८२, राजस्थानात ६,११७, छत्तीसगडमध्ये ५,९७३ आणि तेलंगणामध्ये ५,००१ एकशिक्षक शाळा आहेत. दिल्लीमध्ये ९ एकशिक्षक शाळा आहेत. पुद्दुचेरी, लडाख, दादरा-नगर हवेली आणि दमण-दिव तसेच चंदिगड येथे एकही एकशिक्षक शाळा नाही. अंदमान-निकोबार बेटांमध्ये फक्त ४ अशा शाळा आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले, ‘शाळेमागे जास्त विद्यार्थीसंख्या म्हणजे शालेय पायाभूत सुविधांचा योग्य वापर होतो हे दर्शवते. तर कमी विद्यार्थ्यांच्या शाळांचे एकत्रीकरण करून संसाधनांचा सर्वोत्तम उपयोग साधला जात आहे.’

उत्तर प्रदेश विद्यार्थी संख्येत प्रथम स्थानी

विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार उत्तर प्रदेश पहिल्या स्थानी असून, तेथे ६,२४,३२७ विद्यार्थी अशा शाळांमध्ये शिकतात. झारखंडात ४,३६,४८०, पश्चिम बंगालमध्ये २,३५,४९४, मध्य प्रदेशात २,२९,०९५, कर्नाटकात २,२३,१४२, आंध्र प्रदेशात १,९७,११३ आणि राजस्थानात १,७२,०७१ विद्यार्थी शिकतात. प्रत्येक शाळेमागे सरासरी विद्यार्थ्यांची संख्या पाहता, चंदिगड आणि दिल्ली आघाडीवर असून, अनुक्रमे १,२२२ आणि ८०८ विद्यार्थी प्रत्येक शाळेत आहेत. तर लडाख (५९), मिझोरम (७०), मेघालय (७३) आणि हिमाचल प्रदेश (८२) येथे ही संख्या कमी आहे.

logo
marathi.freepressjournal.in