भारत-पाकिस्तान युद्धविराम लवकरच मोडू शकतो! अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली भीती

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर आम्ही दररोज बारीक लक्ष ठेवून आहोत, दोन्ही देशांमधील युद्धविराम लवकरच मोडू शकतो, अशी भीती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी व्यक्त केली आहे.
भारत-पाकिस्तान युद्धविराम लवकरच मोडू शकतो! अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली भीती
Published on

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर आम्ही दररोज बारीक लक्ष ठेवून आहोत, दोन्ही देशांमधील युद्धविराम लवकरच मोडू शकतो, अशी भीती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी व्यक्त केली आहे. युद्धविराम हाच परस्परांवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही बाजूंना थांबवण्याचा एकमेव मार्ग आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅरिफच्या मुद्द्यावरून सध्या भारत-अमेरिकेमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ आकारला आहे. यामुळे भारताचे आर्थिक नुकसान होणार आहे. ट्रम्प यांची भूमिका पक्षपाती आणि दुटप्पीपणाची आहे. एका बाजूला भारतावर ते इतका प्रचंड टॅरिफ आकारत असताना पाकिस्तान, बांगलादेश, चीन यांना मात्र सवलत देत आहेत. त्या देशांच्या बाबतीत ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

टॅरिफवरुन हा सर्व वाद सुरू असतानाच आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारत-पाकिस्तानवरुन महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर आम्ही दररोज बारीक लक्ष ठेवून आहोत, दोन्ही देशांमधील युद्धविराम लवकरच तुटू शकतो, असे रुबियो यांनी म्हटले आहे. युद्धविराम हाच परस्परांवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही बाजूंना थांबवण्याचा एकमेव मार्ग आहे, असेही ते म्हणाले.

युद्धविरामाच्या बाबतीत सर्वात कठीण गोष्ट म्हणजे तो टिकवून ठेवणे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, आम्ही भारत-पाकिस्तान तसेच कंबोडिया-थायलंडमध्ये दररोज काय सुरू आहे, त्यावर लक्ष ठेवून आहोत, असे रुबियो म्हणाले. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, युद्धविराम तुटू शकतो. आम्ही स्थायी युद्धविरामासाठी प्रयत्न करतोय, यावर कोणीही असहमत होणार नाही. एक शांती करार आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे आताही युद्ध होणार नाही आणि भविष्यातही होणार नाही एका मुलाखतीत रुबियो यांनी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या सैन्य संघर्षाचा दाखला दिला. त्याबद्दल ट्रम्प आपणच हे युद्ध थांबवल्याचा सतत दावा करत असतात. रुबियो म्हणाले की, आपण भाग्यवान आहोत. आपल्याला अध्यक्षांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी शांतता स्थापित करण्याला आपल्या प्रशासनाची प्राथमिकता बनवले आहे. आपण कंबोडिया-थायलंड, भारत-पाकिस्तानमध्ये हे पाहिले आहे. जगात शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा उपयोग करू, असे रुबियो म्हणाले.

ट्रम्प यांचा ४० वेळा एकच दावा

आपणच भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणला, असा ट्रम्प यांनी आतापर्यंत ४० वेळा दावा केला आहे. या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक प्रश्नावर ट्रम्प हे आपणच भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणल्याचा दावा करतात. भारत-पाकिस्तानमध्ये १० मे रोजी युद्धविराम झाला. ट्रम्प यासाठी व्यापाराचे अस्त्र वापरल्याचा दावा करतात. भारत-पाकिस्तान लढत असताना मी व्यापाराची धमकी देऊन युद्धविराम घडवून आणला, असा ट्रम्प यांचा दावा आहे.

logo
marathi.freepressjournal.in